हिंगणा : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या कामगार व कामगारांच्या कुटुंबीयांना विविध याेजनांच्या माध्यमातून १ काेटी ६६ लाख ५ हजार ९२३ रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांमध्ये नागपूरसह भंडारा, गाेंदिया, वर्धा, चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्यातील कामगार व कामगार कुटुंबीयांचा समावेश असून, कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.
नागपूर विभागांतर्गत कोरोना काळात सहा जिल्ह्यातील ३९ कामगार कल्याण केंद्रांच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. मंडळातील सर्व योजना यावेळी ऑनलाईन पद्धतीतून करण्यात आल्या. कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले. कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेतून दहावीपासून पदवी, पदव्युत्तर, तांत्रिक, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या ४,८३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच क्रीडा शिष्यवृत्तीअंतर्गत १६ कामगार पाल्यांना तर विदेशात शिक्षण घेत असलेल्या सहा कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. याशिवाय पाठ्यपुस्तक अनुदानांतर्गत २४७ विद्यार्थी, एमएससीआयटी प्रोत्साहनअंतर्गत १८६ कामगार पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला गेला. मंडळातर्फे अनेक आर्थिक योजना राबविण्यात येतात, याचा लाभ जास्तीत जास्त कामगार व कामगार कुटुंबीयांनी घ्यावा, असे आवाहन नागपूर विभागाचे सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी केले आहे.