लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’च्या काळात हातावर पोट असलेल्या जनतेला शिवभोजन थाळीने मोठा आधार दिला आहे. नागपूर विभागात शिवभोजन थाळीची योजना ८१ केंद्रांमार्फत राबविण्यात येत आहे. या केंद्रांवर दररोज ११ हजार ९०० जेवणाच्या थाळी वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. आतापर्यंत नागपूर विभागात एकूण २ लक्ष २६ हजार २९० नागरिकांना शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात आले आहे.शिवभोजन थाळीचा उपक्रम गेल्या २६ जानेवारीपासून राज्यात सुरु करण्यात आला आहे. कष्टकरी, कामगार तसेच गरजू नागरिकांसाठी केवळ १० रुपयात भोजन उपलब्ध करुन देण्यात येते. राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन' सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने केवळ पाच रुपयात थाळी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला.शिवभोजन थाळी योजनेंतर्गत विभागात दिलेल्या उद्दिष्टानुसार नागपूर शहरातील सहा केंद्रांना प्रतिदिन ३७५० थाळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नागपूर ग्रामीण दहा केंद्रांमार्फत २२५० थाळ्या, वर्धा, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांसाठी सरासरी १०००, चंद्रपूर जिल्ह्यासाठी १६ केंद्रांमार्फत २००० तर गडचिरोली जिल्ह्यातील १२ केंद्रांमार्फत ९०० शिवभोजन थाळ्यांच्या वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.विभागात एप्रिल महिन्यात शिवभोजन थाळी उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यात ६६,०३६, वर्धा जिल्ह्यात २०,०१९, भंडारा जिल्ह्यात १२,०२२, गोंदिया जिल्ह्यात १४,०७५, चंद्रपूर जिल्ह्यात ४४,३२६ आणि गडचिरोली जिल्ह्यात ९,०६६ थाळ्यांचे वितरण करण्यात आले.