हल्दीरामचे शिवकिशन अग्रवाल यांना पुरस्कार : ‘कॅट’चे आयोजननागपूर : व्यापाऱ्यांची अखिल भारतीय संघटना कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली (कॅट) च्या वतीने अलीकडेच नवी दिल्ली येथे दोन दिवसीय व्यापारी संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. देशभरातील २०० पेक्षा जास्त नामांकित व्यापारी उपस्थित होते. आर्थिक मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. संमेलनात ‘कॅट’च्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सात व्यक्तींना भामाशाह रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात हल्दीराम फूड इंटरनॅशनल प्रा.लि.चे संचालक शिवकिशन अग्रवाल यांचा समावेश आहे. अग्रवाल यांना भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांच्या हस्ते पुरस्कार ‘देण्यात आला. यावेळी ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल उपस्थित होते. संमेलनात अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, १०० स्मार्ट सिटी बनविण्यात व्यापाऱ्यांचे योगदान, कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमावर चर्चा करण्यात आली. डॉ. जोशी यांनी सांगितले, ग्लोबल रिटेलर्स भारतात आल्यानंतर त्यांच्या व्यवसाय पद्धतीने भारतातील लहान व्यापाऱ्यांचे शोषण होईल. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आणखी मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी अर्थव्यवस्थेचे नियम आणखी कठोर बनवावे लागतील. त्यासाठी व्यापारी नेत्यांनी सरकारला सहकार्य करावे. देशातील व्यापाऱ्यांची भरभराट व्हावी, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनाही सक्षम होण्याची गरज असल्याचे जोशी म्हणाले. (वाणिज्य प्रतिनिधी)
भामाशाह रत्न पुरस्काराचे वितरण
By admin | Published: July 25, 2014 12:47 AM