नागपूर : नागपूर महापालिकेच्या शाळांसह जिल्ह्यातील ५१५ शाळांमध्ये सेंटर किचनच्या माध्यमातून पोषण आहाराचे वाटप होते. कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळाच बंद असल्याने सेंटर किचनही बंद पडले आहेत. शासनाने सेंटर किचनमध्ये न मोडणाऱ्या शाळांना कच्च्या धान्याचे वाटप सातत्याने सुरू ठेवले. त्यामुळे सेंटर किचनचे विद्यार्थी व पालकांची ओरड होऊ लागली. शैक्षणिक संस्था, संघटनांनी यावरून वादळ उठविले. प्रकरण न्यायालयात गेले. शेवटी शिक्षण संचालनालयाने सेंटर किचन अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभराचा आहार पुरवठ्याचा निर्णय घेतला.
सेंटर किचन अंतर्गत विद्यार्थ्यांना शिजलेला आहार मिळत होता. आता सेंटर किचन मधील शाळेच्या विद्यार्थ्यांना आता चना व मसूर डाळ दिली जात आहे. ७७९८५ विद्यार्थ्यांना त्याचे वितरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना २ लाख ६२ हजार ५०३ किलो चणा, २ लाख ३० हजार १९४ किलो मसूर डाळ, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हरभरा ३ लाख ७१ हजार ९७२ किलो व ३ लाख १५ हजार ६१३ किलो मसूर दाळीचे वाटप सुरू आहे़ पहिली ते पाचवीच्या एका विद्यार्थ्याला ९९४ रुपये ५६ पैसे, तर सहावी ते आठवीच्या प्रतिविद्यार्थी १४८९ रुपये ६२ पैसे धान्यापोटी खर्च होणार आहे़ आहारामध्ये मसूर डाळ, हरभरा, चवळी, मूग व तूर डाळीचा समावेश आहे़ जिल्ह्यात महानगरपालिकेच्या ४३९, महादुला नगरपालिका हद्दीतील १२, कामठी कटक मंडळ अंतर्गत ४७ व वाडी नगरपालिका क्षेत्रातील १७ अशा ५१५ शाळांचा समावेश आहे़ संचालनालयाच्या या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़