नागपूर : शाळा बंद असल्या तरी शासनाने विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा सातत्याने सुरू ठेवला. उन्हाळ्याच्या सुट्यामध्येसुद्धा विद्यार्थ्यांना पोषण आहार वितरित केला. शासन विद्यार्थ्यांना धान्याच्या स्वरूपात पोषण आहार देत आहे. आता पुन्हा ५० दिवसांच्या पोषण आहाराचे वितरण विद्यार्थ्यांना होणार आहे. यंदा शासनाने धान्याच्या मेन्यूमध्ये बदल केला असून, तांदळासोबत मसूर डाळ व हरभरा वितरित केला जाणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शासनाने ३४ दिवसांचे धान्य विद्यार्थ्यांना वितरित केले. त्यात तांदळासोबत चणा आणि मूग डाळ वितरित केली. त्यानंतर ६० दिवसांचा पोषण आहाराच्या वितरणाचे आदेश आले. त्यात मटकी व मुंगाची डाळ वितरित करण्यात आली. आता पुन्हा शासनाने डिसेंबर व जानेवारीचे ५० दिवसांच्या पोषण आहाराचे वितरण करण्याचे आदेश काढले. यात मसूर व हरभऱ्याची डाळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यातील १३६१ शाळांमधील जवळपास ७० हजारांवर विद्यार्थ्यांना लाभ मिळतो आहे. डिसेंबर ते जानेवारी २०२१ या कालावधीतील ५० दिवसांचे धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहाराकडे मागणी नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोषण आहार विभागाने संचालकांकडे मागणी नोंदविली आहे. यानुसार आता पुढे ५० दिवसांसाठी मिळणाऱ्या धान्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी तांदूळ पाच किलो, मसूर डाळ ९०० ग्रॅम व हरभरा १ किलो ९०० ग्रॅम मिळणार आहे. वर्ग सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७ किलो ५०० ग्रॅम तांदूळ तसेच पॅकिंग स्वरूपातील मसूर डाळ १ किलो ३०० ग्रॅम व हरभरा २ किलो ९०० ग्रॅम या स्वरूपात वितरित करण्यात येणार आहे.