नागपूर : जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या भाषा,धर्म,संस्कृतींचे लोक राहतात व ही विविधताच त्या देशांची शक्ती आहे. परंतू ज्या राज्यकर्त्यांना ही विविधता दुर्बलता वाटते,ते त्या विविधतेच्या प्रतिकांना हटविण्याचे प्रयत्न करतात. मात्र ज्या नेत्यांनी या दिशेने पावले उचलली आहेत,त्यांनी आपल्या देशालाच कमकुवत केले आहे,याची इतिहासात नोेंद आहे. रशिया युद्धखोर आहेच,मात्र युक्रेनने विविधता नष्ट करण्याची चूक देखील जगाने दखल घेण्यासारखी आहे. सर्वच देशांनी विविधतेचा सन्मान करायला हवा,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व ‘द वायर’चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी केले.
‘लोकमत’तर्फे देण्यात येणाऱ्या पत्रपंडित पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१७-१८,२०१८-१९ व २०२०-२१ चे बुधवारी थाटात वितरण करण्यात आले. यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खा. कृपाल तुमाने, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा,‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा,‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा,समूह संपादक विजय बाविस्कर,संपादक (सीएमडी) दिलीप तिखिले हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘युक्रेन-रशियाचे युद्ध व त्याचे भारतावरील परिणाम’ या विषयावर वरदराजन यांनी भाष्य केले. रशियाने-युक्रेनवर आक्रमणच केले असून, कायदेशीरदृष्ट्या अनैतिक युद्ध ते लढत आहेत. परंतू या युद्धासाठी रशियाप्रमाणे,युक्रेनदेखील जबाबदार आहे. रशियन मूळ नागरिकांचे वास्तव्य असलेल्या भागात युक्रेनने आश्वासनांचे पालन केले नाही. तेथील लोक युक्रेनमध्येच सन्मानाने जगू इच्छित होते. मात्र युक्रेनच्या राज्यकर्त्यांनी समजूतदारपणा दाखविला नाही. युक्रेनने आपलेपणाची भावना न दाखविल्यामुळे ते नागरिक बाहेरच्यांकडे आशेने पाहू लागले व याचीच परिणती युद्धात झाली. या युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती शीतयुद्धानंतरची सर्वांत भीषण स्थिती आहे. या युद्धाचे दूरगामी परिणाम दिसतील. अमेरिका व युरोपमधील संरक्षण व आर्थिक संबंध जास्त वृद्धिंगत होतील. सोबतच रशिया आर्थिक व सैन्यदृष्ट्या कमकुवत होईल. या युद्धामुळे जगभरात परत एकदा शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू होईल. यातून चीनला फायदा होईल व भविष्यात भारताला धोका निर्माण होईल,असे मत वरदराजन यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’सारख्या वर्तमानपत्रांनी केवळ वृत्तच प्रकाशित केले नाही तर, प्रशासनालादेखील वेळोवेळी आरसा दाखवून समाजात सुधारणा घडविण्यासाठी पुढाकार घेतला. विविध समस्या सोडविण्यात व प्रशासनाला दिशा दाखविण्यात वर्तमानपत्रांचे मौलिक योगदान असते,असे प्रतिपादन प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले. यावेळी राजेंद्र दर्डा यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी मान्यवरांचे स्वागत केले. बाळ कुलकर्णी यांनी संचालन केले तर, दिलीप तिखिले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आर. विमला, माहिती आयुक्त राहुल पांडे, वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, द हितवादचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पुरोहित, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी देवेंद्र वानखेडे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव अतुल कोटेचा, मुजीब पठाण, वरिष्ठ पत्रकार अजय पांडे आदी उपस्थित होते.
मराठी पत्रकारिता कुणापुढे झुकत नाही : राऊत
यावेळी राऊत यांनी केंद्र सरकारला चिमटा काढला. रशिया-युक्रेनप्रमाणे आपल्या देशात प्रत्यक्ष युद्ध सुरू नसले तरी आमच्यासारख्यांना दररोज युद्धाचा अनुभव येत आहे. दिल्लीतील ‘पुतिन’ आमच्यावर रोज ईडी, सीबीआय, इत्यादी केंद्रीय यंत्रणारूपी ‘मिसाईल्स’चा मारा करीत आहेत. आम्ही त्यांच्या हल्ल्यापासून तरीदेखील वाचलो आहोत. देशात तटस्थ पत्रकारिता कुठेतरी भयाच्या छायेखाली आहे. परंतू ‘लोकमत’सारख्या वृत्तपत्रांनी देशाला नेहमीच दिशा दिली आहे. मराठी पत्रकारिता कुणापुढे वाकत नाही व ती झुकतदेखील नाही. हीच परंपरा पुढेदेखील निश्चितपणे कायम राहील,असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले.
सकारात्मक पत्रकारिता ही काळाची गरज : दर्डा
‘लोकमत’ने नेहमी जनसामान्य,शोषित, वंचितांचा आवाज उंच करणारी व त्यांना न्याय मिळवून देणारी पत्रकारिता केली आहे. सकारात्मक व समाजहिताची पत्रकारिता ही काळाची गरज आहे. व ती आणखी दर्जेदार झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. अगदी ग्रामीण पत्रकारांनादेखील मंच मिळावा यासाठी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रेरणेतून हे पुरस्कार सुरू झाले. संपादकांच्या नावाने पुरस्कार देणारे ‘लोकमत’ एकमेव वृत्तपत्र असून निर्भीड व समाजाभिमुख पत्रकारितेची परंपरा कायम राहील, असा विश्वास राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला.
हे ठरले ‘लोकमत’ पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी
म. य. दळवी शोध पत्रकारिता पुरस्कार (२०१७-१८)
१- मनोज शेलार, लोकमत-नंदुरबार
२- विठ्ठल खेळगी, दै. पुण्यनगरी,सोलापूर
३- दत्ता यादव, लोकमत, सातारा
पां. वा. गाडगीळ आर्थिक विकास लेखन स्पर्धा (२०१७-१८)
१- श्रीनिवास नागे, लोकमत-सांगली
२- शांताराम गजे, मुक्त पत्रकार- अहमदनगर
३- सुरेश वांदिले, सेवानिवृत्त माहिती अधिकारी-मुंबई
म. य. दळवी शोध पत्रकारिता स्पर्धा पुरस्कार (२०१८-१९)
१-नरेश डोंगरे, लोकमत- नागपूर
२-प्रदीप राऊत, तरुण भारत- मुंबई
३-संजय पाटील, लोकमत- कऱ्हाड
पां. वा. गाडगीळ आर्थिक विकास लेखन स्पर्धा पुरस्कार (२०१८-१९)
१- विलास पंढरी, सामना- पुणे
२- हनमंत पाटील, लोकमत- पिंपरी चिंचवड
३- प्रमोद जाधव, समाजकल्याण उपायुक्त- सिंधुदुर्ग
म. य. दळवी शोध पत्रकारिता स्पर्धा पुरस्कार (२०१९-२०)
१- सुधीर लंके, लोकमत- अहमदनगर
२- संतोष सूर्यवंशी, सकाळ- नाशिक
३- गणेश वासनिक, लोकमत- अमरावती
पां. वा. गाडगीळ आर्थिक विकास लेखन स्पर्धा पुरस्कार (२०१९-२०)
१-ॲड. कांतीलाल तातेड, लोकसत्ता-नाशिक
२- प्रवीण घोडेस्वार, परिवर्तनाचा वाटसरू-नाशिक
३-प्रा. संजय ठिगळे, लोकमत-सांगली
परीक्षक : ज्येष्ठ पत्रकार कमलाकर धारप, सुधीर पाठक, विराग पाचपोर, शशिकांत भगत, बबनराव वाळके, चंद्रकांत ढाकूलकर.