लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक व नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन १४ हजार ५३३ पात्र अर्जदारांना पोस्टाद्वारे टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. टपाली मतपत्रिकासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात आली आहे. टपाली मतासाठी पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकेकरिता एकूण २४ हजार २५१ अर्ज प्राप्त झाले होते. या संपूर्ण अर्जांची छाननी केली असता त्यापैकी ३ हजार ५७९ अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये अर्जामधील अर्जदारांच्या नामाचा समावेश, यादीचा भाग क्रमांक, अनुक्रमांक योग्यरीत्या न भरणे, नियुक्ती आदेशाची प्रत न जोडणे आणि विहीत कालमर्यादेत म्हणजेच दिनांक ८ एप्रिल २०१९ नंतर अर्ज सादर करणे या कारणास्तव अर्ज रद्द करण्यात आले आहेत.मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ६ हजार १३९ अर्ज इतर जिल्ह्यातील असल्यामुळे हे अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील पात्र १४ हजार ५३३ अर्जदारांना टपाली मतपत्रिका (पोस्टल बॅलेट पेपर) पोस्टामार्फत पाठविले आहे. त्यापैकी ५ हजार २४६ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या असल्याची माहिती अश्विन मुदगल यांनी दिली.टपाली मतपत्रिकेसंदर्भतील संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असून पोस्टामार्फत पात्र अर्जदारांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.रामटेक लोकसभा मतदार संघात टपाली मतपत्रिकेसाठी १३ हजार ७३१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ हजार ७१ अर्ज रद्द ठरविण्यात आले होते. ६ हजार ४५८ अर्ज टपालाद्वारे तर इतर मतदार संघातील ५ हजार २०२ अर्जदार संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच नागपूर लोकसभा मतदार संघातील कर्मचाऱ्यांकडून १० हजार ५२० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ हजार ५०० अर्ज रद्द करण्यात आले. ८ हजार ७५ अर्जदारांना टपालाद्वारे मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. इतर मतदार संघातील ९३७ अर्जदारांचे अर्ज संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत.