लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘मनरेगा’अंतर्गत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) मोठ्या प्रमाणात कामे घेण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात ५७ हजार ५५० कामे पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून श्रमिकांना २८५ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. श्रमिकांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर आहे, अशी माहिती ‘मनरेगा’ आयुक्त ए.एस.आर.नायक यांनी दिली.मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे अशा सर्व श्रमिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. यासाठी १९ प्रकारच्या कामांसाठी साधारणत: ५ लाख ८७ हजार ३६० कामे तयार ठेवण्यात आली आहेत. या कामांमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वाधिक कामे उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यासोबतच कृषी फलोत्पादन, जलसंधारण, प्रधानमंत्री आवास योजना, जलसिंचन विहिरी आदी कामांचा समावेश आहे. ‘जॉबकार्ड’ असलेल्या मजुरांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या, असे नायक यांनी सांगितले.जलसिंचन विहिरींतर्गत नागपूर विभागात १६९ विहिरी पूर्ण झाल्या असून मजुरीपोटी १ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च झाला. मनरेगांतर्गत फळबाग योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. विदर्भात १ हजार ४२६ लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत मजुरी तसेच साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.नागपूर विभागात सव्वाचार हजार घरे बांधलीप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून राज्यात २६ हजार ९८४ घरांचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी लाभार्थ्यांना ४७ कोटी ३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नागपूर विभागात ४ हजार २६७ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यावर ७ कोटी ८९ लाख ४३ हजारांचा निधी खर्च झाला आहे. चंद्रपूर (१,०६६), नागपूर (६०५), भंडारा (५३७), गोंदिया (२४१), वर्धा (३३८) व गडचिरोली (४४५) यांचा यात समावेश आहे, असे प्रतिपादन नायक यांनी केले.
‘लॉकडाऊन’मध्ये मनरेगातून श्रमिकांना २८५ कोटींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:33 AM