दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा : कारवाईला सुरुवात नागपूर : जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचाच दर्जा मिळावा, या मागणीसाठी लोकमतने ‘दीक्षाभूमीच्या सन्मानासाठी’ या शिर्षकांतर्गत लढा सुरू केलेला आहे. या अभियानाला आंबेडकरी संघटना व जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले होते. लोकमतच्या अभियानाची दखल घेत जिल्हा नियोजन समितीने दीक्षाभूमीला अ वर्ग पर्यटनस्थळाचाच दर्जा मिळावा, अशी एकमुखी मागणी करणारा ठराव मंजूर केला होता. जिल्हा नियोजन समितीने केलेला तो ठराव, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला पाठविला आहे.त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळण्याच्या दिशेने आता कारवाई सुरू झाली आहे.दीक्षाभूमीला अ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी लोकमतचा लढ्याला अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी व माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी २७ आॅगस्ट रोजी पत्राद्वारे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती केली. त्यावर पालकमंत्र्यांनी २८ आॅगस्टला रविभवनात एक बैठक घेतली. त्यात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर ३१ आॅगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत आ.प्रा. जोगेद्र कवाडे यांच्यासह आ. प्रकाश गजभिये, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर देशमुख आदींनी दीक्षाभूमीला अ श्रेणीचा दर्जा देण्याची जोरदार मागणी केली. एकूणच सदस्यांची भावना लक्षात घेता दीक्षाभूमीला अ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याबाबत जिल्हा नियोजन समितीने एकमुखाने प्रस्ताव पारित केला. तसेच यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली आहे.शासनाच्यावतीने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविला शासनाला प्रस्ताव
By admin | Published: September 12, 2015 3:01 AM