लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात बेड मिळणे आता कठीण झाले आहे. यातच ग्रामीण भागातही मृत्यूची संख्या वाढत आहे. शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झालेल्यांमध्ये शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक होती. ही गंभीर परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ५०-५० ऑक्सिजन बेडची क्षमता असणारे डिस्ट्रीक्ट कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत कामठी व रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी या दोन्ही रुग्णालयांचा दौरा केला होता. सोबतच रुग्णालयात उपलब्ध सुविधांची पाहणीसुद्धा केली होती. यानंतर या रुग्णालयाला कोविड हेल्थ सेंटरमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांवर येथेच उपचार होऊ शकतील. सूत्रानुसार रुग्णालयांनासुद्धा याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या दोन्ही सेंटरमध्ये तीव्र लक्षण असणाऱ्या रुग्णांना प्राथमिक उपचार देऊन शासकीय रुग्णालयात रवाना केले जाईल. येथे केवळ त्याच कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यासंदर्भात डॉ. पातुरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.
गेल्या आठवडाभरापासून शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. उपचाराअभावी ग्रामीण भागात मरणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढत आहे. ग्रामीण भागात खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचाराला परवानगी देण्यात आली आहे; परंतु खासगी रुग्णालयातील लाखोंचा खर्च ग्रामीण भागातील लोकांना परवडणारा नाही. त्यामुळे बहुतांश रुग्ण घरी राहूनच उपचार घेत आहेत. प्रकृती गंभीर झाल्यास शासकीय रुग्णालयात सुविधा नसल्याने शहराकडे धाव घेतात; परंतु शहरातही बेड उपलब्ध नसल्याने जीव गमवावा लागत आहे.