लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड लसीकरणाची गती वाढण्याऐवजी पुन्हा एकदा मंद पडण्याचीच शक्यता वाढली आहे. बुधवारी ११,४८० लसीचे डोस मिळाल्यानंतर गुरुवारी जिल्ह्याला लसीचे डोस मिळालेच नाही. अशा परिस्थितीत लसीकरणाची मोहीम प्रभावित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना ते सुद्धा दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे पुन्हा एकदा मोहीम प्रभावित होण्याची शक्यता आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सुधारणा झाली. ८२ मेट्रिक टनच्या तुलनेत गुरुवारी १०१ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाले. यापैकी ६९ मेट्रिक टनचा पुरवठा रुग्णालय व ऑक्सिजन प्लांटला करण्यात आला. त्याचप्रकारे कोविड संक्रमणात आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठ्यात कुठलीही सुधारणा झाली नाही. बुधवारप्रमाणेच गुरुवारीही जिल्ह्याला ४४१ रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले.