नागपूर : शिवसेनेचे एक जिल्हाप्रमुख, दोन उपजिल्हाप्रमुख व तीन तालुकाप्रमुख यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला. मात्र, शिवसेनेकडून अद्याप या पदांवर नव्याने नियुक्त्या झालेल्या नाहीत. यामुळे खासदार-आमदारांसोबत न गेलेल्या व आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, असे ठासून सांगणाऱ्या शिवसैनिकांचा आता संयम सुटू लागला आहे. पुन्हा गळती लागण्यासाठी आता तरी मुंबईच्या नेत्यांनी वेळीच लक्ष द्यावे, अशी भावना शिवसैनिक व्यक्त करू लागले आहेत.
सर्वप्रथम रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल हे शिंदे गटात गेले; पण आपण शिवसेनेतच असल्याचा त्यांचा दावा आहे. जयस्वाल यांच्यासोबत रामटेक विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख वर्धराज पिल्ले, पारशिवनीचे तालुका प्रमुख राजू भोसकर व रामटेकचे तालुका प्रमुख विवेक तुरक हेदेखील गेले. त्यांनतर, त्यानंतर खासदार कृपाल तुमाने हेदेखील शिंदे गटात सहभागी झाले. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार हे विमानतळावर पोहोचले होते व त्यांनी आपण तुमाने यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.
इटकेलवार यांच्याकडे उमरेड, कामठी, रामटेक या तीन विधानसभा मतदारसंघांचा प्रभार होतो. यानंतर तुमाने यांच्यासोबत काटोल विधानसभेची जबाबदारी असलेले उपजिल्हाप्रमुख धोटे व कुही येथील तालुकाप्रमुख यॅडके हेदेखील गेले. मात्र, या पदांवर शिवसेनेकडून अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत असे सांगणाऱ्या शिवसैनिकांमध्येही असंतोष पसरू लागला आहे. संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी वेळीच ही वास्तविकता मुंबईच्या नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्याची गरज कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
प्रकाश जाधव नेत्यांना भेटले
माजी खासदार प्रकाश जाधव हे गेल्या आठवड्यात मुंबईतील शिवसेना नेत्यांची भेट घेऊन आले. त्यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी एक-दोन नावे सुचविली असल्याची माहिती आहे. मात्र, नेत्यांनी सुचविलेल्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी मुंबईतील नेत्यांनी त्रयस्त यंत्रणे मार्फत संबंधितांच्या क्षमतेची माहिती घ्यावी, अशी काही पदा धिकाऱ्यांची सूचना आहे.
नागपूरची जबाबदारी घेणारे संजय राऊत ईडीच्या फेऱ्यात
खासदार संजय राऊत यांनी नागपूरची जबाबदारी घेतली होती. त्यांनी सुमारे चार ते पाच वेळा नागपूरचा दौरा करीत पदाधिकाऱ्यांच्या बैठका व सामान्य कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, आता राऊत यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे आता त्याच तोडीच्या नेत्याने नागपूरची जबाबदारी घ्यावी व नियुक्त्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.