सावनेर : नागपूर जिल्ह्यात शिवसेनेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि नगरपरिषदेच्या सदस्यांची संख्या गेल्या काही वर्षांत घटली आहे. जिल्हाप्रमुख राजू हरणे यांनी शिवसेनेला प्रा. लि. केले आहे. हीच परिस्थितीत कायम राहिल्यास जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेनेचे अस्तित्व संपेल. त्यामुळे पक्षप्रमुखांनी हा विषय गांभीर्याने घेत सामान्य शिवसैनिकांना न्याय द्यावा. यासोबतच तातडीने जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करावी, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सावनेर येथील विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख शिवसैनिकांची बैठक झाली. तीत जिल्हाप्रमुख राजू हरणे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात आले. यानंतर आयोजित पत्रपरिषदेत जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी वरिष्ठ नेते विनोद जिवतोडे, उत्तम कापसे, किशोर राय, संदीप बरडे, रितेश हेलोंडे, संतोष केचे यांनी केली. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना निर्णय प्रक्रियेत डावलले जाते. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे शिवसेनेचे जिल्ह्यातील अस्तित्वच कमी होत असल्याचा आरोप उत्तम कापसे यांनी केला. याप्रसंगी नामदेव मोरे, खापा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भूपेंद्र कोसे, विजय पोटोडे, तिलक क्षीरसागर, संजय गिरमेकर, रवींद्र काटकर, दिवाकर कडू, लाला यादव, जितू बिंदानी, छोटू सिंग, मिलिंद कुर्वे, रोशनी चौधरी, विशाखा शेलारे, राधेश्याम गावंडे, शिवदीन देशमुख, प्रशांत कामोने, आशिष धोटे, युवराज कुंभारे, आशिष धांडोळे, सुहास लाड, स्वप्निल लाडेकर, आदी उपस्थित होते.
-
माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहे.
आरोप लावणाऱ्यांनी स्वत:चे पक्षासाठी काय योगदान आहे, हे एकदा तपासून घ्यावे. राहिला विषय तो जिल्ह्यात शिवसेना प्रा.लि. झाल्याचा. यात काही एक तथ्य नाही. जिल्हाप्रमुखांच्या वर पक्षात आणखी मोठे नेते आहेत. संपर्कप्रमुख, समन्वयक, खासदार आहेत. त्यांना विचारूनच निर्णय घेतले जातात. मी कोणताही निर्णय एकांगी घेत नाही.
- राजू हरणे
जिल्हाप्रमुख, शिवसेना, नागपूर ग्रामीण