नागपूर: विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास व्हावा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाचे १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव पारशिवनी तालुक्यातील करंभाड येथील सेक्रेडहार्ट स्कुलच्या प्रांगणात पार पडणार आहे. गुरुवारला सकाळी १० वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन पार पडेल. अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्षा कुंदा राऊत राहील.
तर प्रमुख अतिथी म्हणून सीईओ सौम्या शर्मा,प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण समिती सभापती राजकुमार कुसुंबे, सभापती प्रा. अवंतिका लेकुरवाळे, प्रवीण जोध, मिलिंद सुटे यांच्यासह जि.प.सदस्य उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी या महोत्सवासाठी जि.प.च्या सेसफंडामध्ये तरतूद करण्यात येते. त्यानुसार प्रथम बिट, तालुका व विभाग स्तरावर या क्रीडा स्पर्धा पार पडतात. यानंतर येथून उल्लेखनिय कामगिरी बजाविणारे सर्व संघ, विद्यार्थी या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होतात. यंदाच्या या स्पर्धांत सुमारे पाच हजारांवर विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सर्व खेळाडुंची व्यवस्था, ये-जा करण्याचा खर्च जि.प.कडूनच करण्यात येणार आहे.