नरखेड/जलालखेडा/काटोल/सावनेर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात नरखेड, काटोल, सावनेर, कळमेश्वर आणि रामटेक तालुक्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे गहू, चना पिकांसह संत्रा आणि मोसंबीच्या बागांचे नुकसान झाले आहे.
लॉकडाऊनंतर शेतकरी आधीच संकटात असताना वातावरणात झालेला अचानक बदल आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नरखेड तालुक्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तालुक्यात सर्वत्र दमदार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे शेतात कापून ठेवलेल्या चना, तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात काही ठिकाणी चण्याचे पीक कापणीला आले आहे, तर काही ठिकाणी कापून जमिनीवर पडले आहे. हवामान खात्याने गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तविलेली आहे. मंगळवारी नरखेड तालुक्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशात गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नरखेड तालुक्यातील, अंबाडा, मेंढला, जलालखेडा, थडीपवनी भारसिंगी, खापा, खैरगाव शिवारात जोरदार पाऊस झाला. थडीपवनी येथे मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारास लहान आकाराच्या गारासुद्धा पडल्या आहेत. दिवसभर ढगाळलेल्या वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू होता. पाऊस सतत सुरू राहिल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
--
अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू, संत्रा, मोसंबी, भाजीपालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.
योगेश भड, शेतकरी, अंबाडा
-----
गतवर्षी कोरोनामुळे त्रस्त झालो होतो. आता कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
- राजकुमार पांडव, शेतकरी, खरबडी