उमरेड : तालुक्यातील सिर्सी ग्रामपंचायतीचे सरपंच विलास विठ्ठल माकोडे यांच्यावर अविश्वासाची नोटीस बजावण्यात आली आहे. सदर ग्रामपंचायतीमध्ये एकूण सदस्यसंख्या १५ होती. यापैकी एका सदस्याचा मृत्यू झाल्याने आता एकूण १४ सदस्य आणि सरपंच असा कार्यभार या ग्रामपंचायतीचा आहे.
मागील काही महिन्यापासून सदर ग्रामपंचायतीमध्ये विविध कारणांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. अशातच एकूण १४ सदस्यांपैकी १० सदस्यांनी अविश्वास आणत नोटीस बजावली.
तहसीलदार प्रमोद कदम यांच्याकडे सदर ठराव सुपूर्द केल्यानंतर आता १८ डिसेंबर ला सकाळी ११ वाजता अविश्वास ठरावाबाबत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उपसरपंच भोजराज दांदडे यांच्यासह अन्य नऊ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या या अविश्वास ठरावाच्या नोटीसवर आहेत. यामुळे सरपंच विलास माकोडे यांच्यावर दाखल करण्यात आलेला ठराव पारित होणार की नाही याचा निर्णय १८ डिसेंबरला होणार आहे.
ग्रामसभा व मासिक सभेची सदस्यांना पूर्वसूचना न देणे, शासकीय निधीचा गैरवापर, ठरावानुसार नियोजित वेळेत कार्य न करणे, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांच्या वितरणात भ्रष्टाचार, ग्रामपंचायत स्तरावरील विषय समिती तयार न करणे आदी आरोप अविश्वास ठरावाच्या नोटीसमध्ये १० सदस्यांनी केला आहे. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना अविश्वासावरून राजकारण तापले आहे.