नागपूर : कोरोना उपाययोजनांकरिता सीएसआर निधी मिळवण्यासाठी नागपूर विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी २१ मे रोजी ४८ उद्योगांना पत्र लिहिले. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.
१९ मे रोजी उच्च न्यायालयाने नागपूर विभागातील उद्योगांकडे किती सीएसआर निधी उपलब्ध आहे याची माहिती घेण्याचा आदेश विभागीय आयुक्तांना दिला होता. विभागीय आयुक्तांच्या पत्राला ३८ उद्योगांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी २६ उद्योगांनी २०२१-२२ या वर्षाकरिता सीएसआर अंतर्गत ४२ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, यातील ९ कोटी ६६ लाख रुपये कोरोनाकरिता खर्च केल्याचे सांगितले. सध्या ११ कोटी ६६ लाख रुपये शिल्लक असून, त्यातील २ कोटी ६४ लाख रुपये पुन्हा कोरोनासाठी दिले जातील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे. १२ उद्योगांनी सीएसआर तरतुदीवर अद्याप निर्णय झाला नसल्याचे कळवले आहे तर, दहा उद्योगांनी प्रतिसाद दिला नाही.