लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दुरवस्थेबाबत सात दिवसात चौकशी करावी व कुणी दोषी आढळल्यास कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने तीन सदस्यीय समितीने गुरुवारी ‘सुपर’ची दिवसभर पाहणी केली.हिवाळी अधिवेशनामध्ये आ. अनिल सोले यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील समस्यांवर लक्षवेधी सूचना मांडली होती. यात हॉस्पिटलमधील अस्वच्छता, रुग्णांना करावा लागणारा दुर्गंधीचा सामना, जैविक कचऱ्याची अनियमित उचल, स्वच्छतेसाठी असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कुणाचे नियंत्रण नाही, रुग्णांना आहारात पुरेशा पोळ्या दिल्या जात नाही, निकृष्ट आहार, लिफ्टही बंद राहत असल्याने अडचणीत येत असलेले रुग्ण असा आरोप विधान परिषदेत आ. सोले व आ. नागो गाणार यांनी केला. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई हवी, अशी मागणी डॉ. रणजित पाटील यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनीदेखील तेथील रिक्त जागांचा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लोकप्र्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु हे उत्तर चुकीचे असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी विरोधकांनी मागणी केली. यावर उपसभापतींनी चौकशीचे निर्देश दिले. त्यानुसार विभागीय चौकशीला सुरुवात झाली. गुरुवारी सोलापूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह तीन सदस्यीय चमूने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली. ही चमू शुक्रवारीही पाहणी करणार असल्याची माहिती आहे.