लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भातील दिव्यांग बांधवांना आर्थिक उभारी देण्यासाठी अपंग विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय नागपुरात स्थापन करण्यात आले होते़ सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत महामंडळाचे कार्यालय होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच या कार्यालयाने नागपुरातून कायमचाच गाशा गुंडाळला आहे़सध्या या कार्यालयाला कुलूप लागले आहे़ २०१२ पासून नागपुरात हे कार्यालय सुरू करण्यात आले होते. या कार्यालयात विभागीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. काही दिव्यांग कर्मचाऱ्यांची यावर नियुक्ती केली होती. राजकुमार बडोले हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री झाल्यानंतर महामंडळाचे विभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी पीए म्हणून ठेवून घेतले. त्यांचे पीए असलेले गजानन वाघ हे मंत्र्यांच्या कामकाजाबरोबरच कार्यालयाचे कामकाज सांभाळायचे. या कार्यालयाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या कर्जवाटपाच्या प्रस्तावाचा स्थानिक पातळीवर निपटारा होत होता. या कार्यालयाचे क्षेत्र संपूर्ण विदर्भभर पसरले होते.परंतु, सामाजिक न्यायखात्याचे मंत्री बडोले यांची उचलबांगडी झाल्यानंतर सुरेश खाडे यांनी या खात्याच्या मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला़ त्यानंतर प्रचंड घडामोडी झाल्या़ तडकाफडकी येथील कार्यालय बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या़ तसेच या कार्यालयाचे अधिकारी वाघ यांना त्यांची मूळ पदस्थापना बुलडाणा येथे परतण्याच्या सूचना करण्यात आल्या़ परंतु, अद्यापही हे कार्यालय का बंद करण्यात आले, याचे स्पष्ट उत्तर सामाजिक न्याय विभागाच्या कुठल्याही बड्या अधिकाऱ्यांकडे नाही़ अंतर्गत राजकारण काहीही असले तरी या कार्यालयामार्फत बेरोजगार दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगाराची संधी मिळत होती. काहींचे अर्ज अर्थसाहाय्य प्रस्तावित होते़ यापूर्वीच शासनाने महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना बंद केल्या आहेत़ ज्या सुरू आहेत, त्यातून कसातरी लाभ दिव्यांग बांधवांना मिळायचा़ आता या कार्यालयाअभावी तो लाभही मिळणे दुरापास्त झाले आहे़
अपंग विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने गाशा गुंडाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 11:11 PM
विदर्भातील दिव्यांग बांधवांना आर्थिक उभारी देण्यासाठी अपंग विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय नागपुरात स्थापन करण्यात आले होते़. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच या कार्यालयाने नागपुरातून कायमचाच गाशा गुंडाळला आहे़
ठळक मुद्देसामाजिक न्यायभवनातील कार्यालयाला कुलूप