नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त येत्या सोमवारपासून नागपुरात राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय सुरु करण्यात येत आहे. त्यादिवशी विभागातील सर्व जिल्ह्यातील पीडित महिलांच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने ऐकूण घेतल्या जाणार असून त्यांचे समुपदेशनही करण्यात येईल.
नागपूर, भंडाारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे या कार्यालयामार्फत तात्काळ निवारण तसेच त्यांचे समुपदेशन केले जाईल. स्थानिक पोलीस ठाण्याकडून यासाठी सहकार्य घेतले जाईल. अतिमहत्त्वाच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी किंवा स्वत:हून नाेंद घेण्याच्या तक्रारीबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येणार आहे.
ही सुनावणी विभागीय कार्यालयाकडून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून त्यासाठी कार्यालयामध्ये विधी सल्लागार, संरक्षण अधिकारी, समुपदेशक व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नागपूर विभागातील अत्याचार पीडित महिलांनी समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य महिला आयोग शासकीय करुणा महिला वसतिगृह पाटणकर चौक नारी रोड येथे संपर्क साधाावा, असे महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त यांनी कळविले आहे.