राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वयोवृद्ध सासू-सासऱ्यांना छळणाऱ्या व त्यांच्यावर हात उगारणाऱ्या पत्नीमुळे पतीला घटस्फोट मंजूर करून विवाह संपुष्टात आणला आहे. पतीने पत्नीची क्रूरता सिद्ध करणारे विविध पुरावे सादर केले होते. त्या आधारावर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी हा निर्णय दिला.प्रकरणातील दाम्पत्याचे २३ मे २०१३ रोजी लग्न झाले होते. पत्नी लग्नाच्या दिवसापासूनच विचित्र वागत होती. ती लग्न मंडपात निर्धारित वेळेपेक्षा दोन तास विलंबाने पोहोचली होती. लग्नानंतर ती वयोवृद्ध सासू-सासऱ्यांसोबत क्षुल्लक कारणांवरून भांडण करीत होती. त्यांच्यावर हात उगारत होती. त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलत होती. घरचे काम करावे लागू नये म्हणून तब्येत खराब असल्याचा बहाणा सांगून शयनकक्षात आराम करीत होती. पत्नीने पती व सासू-सासऱ्याला मुलीच्या बारशाला बोलावले नाही. पत्नी सासू-सासऱ्याला एकटे सोडून स्वतंत्र राहण्याचा हट्ट करीत होती. कोणती गोष्ट मनाविरुद्ध झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत होती. उच्च न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता पत्नीला क्रूर ठरवून पतीला घटस्फोट मंजूर केला. कुटुंब न्यायालयाने घटस्फोटाची याचिका खारीज केल्यानंतर पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
पत्नीचे आरोप बिनबुडाचेघटस्फोट प्रकरणातील उत्तरात पत्नीने पती, सासू-सासरे व नणदांवर खोटे आरोप केले होते. सासरची मंडळी हुंड्यासाठी छळ करतात, पती चारित्र्यावर संशय घेतो, नणंदा गर्भपातासाठी दबाव आणत होत्या, पती शारीरिक संबंध ठेवू देत नाही इत्यादी गंभीर आरोपांचा त्यात समावेश होता. पत्नीला त्यासंदर्भात पुरावे सादर करता आले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने पत्नीचे आरोप बिनबुडाचे ठरवले.