राकेश घानोडेनागपूर : आयुष्य केव्हा कोणते वळण घेईल, हे कुणीही सांगू शकत नाही. एक दाम्पत्य भांडण विकोपाला गेल्यानंतर सहमतीने घटस्फोट घेऊन विभक्त झाले होते. त्यावेळी पत्नी गर्भवती होती. दरम्यान, पत्नीने गोंडस मुलीला जन्म देताच या दाम्पत्यामधील ताणलेले संबंध हळूहळू सैल होत गेले आणि त्यांनी जुने सर्व वाद विसरून पुनर्विवाह केला. (Divorced couples reunite because of a newborn cute girl)प्रकरणातील पती-पत्नी अभियंते असून, ते दोघेही तोडीस तोड असल्यामुळे त्यांच्यामध्ये विविध कारणांवरून वाद व्हायचे. पतीने वारंवार पार्ट्या करणे, मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणे, दारू पिणे इत्यादी गोष्टी पत्नीला आवडत नव्हत्या, तर पत्नीचे सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणे, माहेरी तासनतास फोनवर बोलणे, घराच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणे इत्यादी गोष्टी पतीला पटत नव्हत्या. कुटुंबात दोघेच असल्यामुळे त्यांना समजावण्यासाठी तिसरे कोणीच राहत नसे. परिणामी, दोघेही माघार घेत नव्हते.
त्यातून त्यांचे भावनिक बंध हळूहळू तुटायला सुरुवात झाली. लग्नानंतर आनंदात सुरू झालेला संसार दोन वर्षांतच विस्कटला. प्रेमाची जागा अहंकाराने घेतली. शेवटी एकमेकांसोबत पटतच नाही तर, एकत्र राहायचे कशाकरिता, असा प्रश्न त्यांना सतवायला लागला आणि त्यांनी सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पत्नी गर्भवती होती; पण डोळ्यांवर मी पणाची पट्टी असल्यामुळे दोघांपैकी कुणीही याचा विचार केला नाही. ते घटस्फोट घेऊन वेगळे झाले; परंतु मुलीच्या जन्माने त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचा ओलावा पुन्हा जिवंत केला. ती मुलगी त्यांच्यामधील प्रेमाचा पुरावा होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकत्र येऊन विस्कटलेली संसाराची घडी पुन्हा बसविली अन् नवीन प्रवासाला सुरुवात केली.प्रेमाची जाणीव गरजेचीपती-पत्नीमध्ये वाद होण्यात काहीच नवीन नाही; परंतु वाद वाढत असल्यास त्यांना एकमेकांवरील प्रेमाची जाणीव करून देणे गरजेचे असते. या प्रकरणात विभक्त दाम्पत्याच्या गोंडस मुलीने हेच केले. समीर सोनवणे, पत्नीचे वकील