--------------------------------------------------
- गुन्हे शाखेचे पाच युनिट, सहा पोलीस ठाण्यातील ताफा पारडीत तैनात.
- चार्ली कमांडो आणि दंगा नियंत्रण पथकही सज्ज
----
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारडी पोलीस ठाण्याच्या आवारात मनोज हरिभाऊ ठवकर (वय ३५) नामक तरुणाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाची चाैकशी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आली आहे. दरम्यान, ठवकरच्या संशयास्पद मृत्यूने पारडी भागात बुधवारी रात्रीपासून निर्माण झालेला तणाव आजही कायम होता. शोकसंतप्त वातावरणात मनोजवर गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
बुधवारी रात्री ८.२०च्या सुमारास पारडी चाैकात पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. पारडीतील भवानी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमागे राहणारा मनोज ठवकर त्याच्या ॲक्टिव्हाने आला. त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, मनोजने दुचाकीचा वेग वाढवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या दुचाकीचा कट बंदोबस्तावर असलेले पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे यांना लागला. त्यामुळे ढोबळेंना दुखापत झाली. त्यामुळे पोलिसांनी मनोजला पकडून बेदम मारहाण केली. त्याला पारडी ठाण्यात नेऊन बसवले. तेथे तो कोलमडला. त्याची हालचाल बंद झाल्याचे पाहून हादरलेल्या पारडी पोलिसांनी त्याला भवानी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मनोजचा मृत्यू पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे झाल्याचा आरोप करत मोठ्या संख्येत जमाव हॉस्पिटल आणि पारडी ठाण्यात पोहोचला. त्यांनी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मनोजच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. पाहता पाहता प्रचंड तणाव वाढला. त्यामुळे पोलीस उपायुक्त निलोत्पल, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी हेदेखील पारडीत पोहोचले. त्यांनी संतप्त जमावाची कशीबशी समजूत काढली. त्यानंतर आज सकाळपासूनच या भागात गुन्हे शाखेच्या पाचही युनिटची पथके आणि सहा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह चार्ली कमांडो, दंगा नियंत्रण पथकही बंदोबस्तासाठी पारडीत तैनात करण्यात आले. दरम्यान, पोलीस महासंचालनालयातून मिळालेल्या आदेशानुसार सीआयडी नागपूरच्या एसपी राजकन्या शिवरकर यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानुसार, पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदवून घेण्यात आले.
---
न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समक्ष पंचनामा
दरम्यान, प्रथम सत्र न्याय दंडाधिकारी विशाल देशमुख यांच्या उपस्थितीत इन्क्वेस्ट पंचनामा करून घेण्यात आला. त्यानंतर तीन डॉक्टरांच्या पॅनलने मनोजचे शवविच्छेदन केले. त्याचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मनोजवर शोकसंतप्त वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
---
ढोबळेसह तिघांची तडकाफडकी बदली
संतप्त नागरिकांचा रोष लक्षात घेता पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे आणि अंमलदार आकाश शहाने या तिघांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली.
---
वरिष्ठ गुंतले तपासात
या प्रकरणात पोलिसांचा दोष दिसला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, घटनास्थळ तसेच पारडी ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, सीआयडीसह वरिष्ठ पोलीस अधिकारीही ते रात्रीपर्यंत तपासत होते.
----