नागपूर - दिवाळी आणि भाऊबीजेच्या निमित्ताने वेगवेगळ्या गावांना जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची लगबग वाढल्याने येथील रेल्वेस्थानक आणि बसस्थानकावर मोठी गर्दी झाली आहे. काही रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने रेल्वेस्थानकावरील गर्दीत सारखी भर पडत आहे. तर, दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने एसटीला पुन्हा जुन्या दिवसांची आठवण होऊ लागली आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अचानक वाढते. त्यात भाऊबीजेची भर पडते. अनेक सासुरवाशिणी आपल्या भावाला ओवाळण्यासाठी आपापल्या माहेरी धाव घेतात. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीत आणखीच भर पडते. तशीही गेल्या आठ दिवसांपासून रेल्वेस्थानकावर पाय ठेवायला जागा नाही, एवढी प्रवाशांची गर्दी आहे. नागपूरहून कोलकाता-हावडा, गोरखपूर, दिल्ली, भोपाळ, आग्रा, पुणे, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, गोंदिया, रायपूर, चंद्रपूर, चेन्नई, विशाखापट्टनम या मार्गांनी धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची चिक्कार गर्दी आहे. जनरल डब्यात एकमेकांना खेटून प्रवासी प्रवास करीत आहेत. या गर्दीमुळे रेल्वेस्थानकावर मुंबईतील लोकलसारखी स्थिती आहे. फलाटावर गाडी येऊन थांबत नाही तोच उतरणाऱ्यांपेक्षा आतमध्ये चढणाऱ्यांचीच घाईगडबड दिसून येत आहे. परिणामी प्रवाशांमध्ये धक्काबुक्की, शाब्दिक चकमकीही झडत आहेत.
रेल्वेस्थानकावर ही स्थिती असताना बसस्थानकांवरही असेच काहीसे मिळतेजुळते चित्र आहे. लालपरीला गर्दी आवरेनासी झाल्यामुळे अनेक दिवसांपूर्वीचे प्रवाशांच्या प्रतिसादाचे ते सुगीचे दिवस पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्ताने एसटी महामंडळ अनुभवत आहे.
काही दिवसांसाठी का होईना...
ट्रॅव्हल्स आणि इतर खासगी प्रवासी वाहनांमुळे एसटीपासून प्रवासी दूर झाला होता. मात्र, आता सणाच्या निमित्ताने काही दिवसांसाठी का होईना एसटी बसेस भरभरून धावत आहेत.