दयानंद पाईकराव
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता ९० टक्के रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दिवाळीपर्यंत अनेक मार्गाचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दिवाळीला दोन महिने असताना आरक्षण फुल्ल झाल्यामुळे दिवाळीत अनेक प्रवाशांची गैरसोय होणार आहे. परिणामी दिवाळीच्या काळात अनेक प्रवाशांना इतर वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करावा लागणार आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
अ) ०२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ विशेष रेल्वेगाडी
ब) ०२१३६ नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाडी
क) ०२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम विशेष रेल्वेगाडी
ड) ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो विशेष रेल्वेगाडी
इ) ०१०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र विशेष रेल्वेगाडी
याशिवाय नागपूर मार्गे धावणाऱ्या स्पेशल रेल्वेगाड्याही सुरू आहेत.
मुंबई, पुण्याचे तिकीट मिळेना
- दिवाळीला दोन महिने शिल्लक असले तरी आतापासूनच दिवाळीच्या रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. मुंबई आणि पुणे मार्गावर सर्वच क्लासमध्ये वेटिंगची स्थिती आहे. यात रेल्वेगाडी क्रमांक ०२१९० नागपूर-मुंबई स्पेशलमध्ये सात नोव्हेंबरला स्लिपर क्लासमध्ये ६९ वेटिंग आहे. ०२१०६ गोंदिया-मुंबई स्पेशलमध्ये एसी टु ३१ वेटिंग, एसी थ्री ३१ वेटिंग, स्लिपरमध्ये ५७ वेटिंग, आठ तारखेला याच गाडीत एसी टू मध्ये ३, एसी थ्री ३ आणि स्लिपरमध्ये १३ वेटिंग आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२१७० नागपूर-मुंबई स्पेशलमध्ये एसी टू १२, एसी थ्री १० वेटिंग आहे, तर पुण्याला जाणाऱ्या गाड्यात रेल्वेगाडी क्रमांक ०२११४ नागपूर-पुणे गरीबरथ मध्ये २५ आरएसी सुरू आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२०३६ नागपूर-पुणे स्पेशलमध्ये ८ नोव्हेंबरला एसी टू मध्ये ४ वेटिंग आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०१०४० गोंदिया-कोल्हापूर स्पेशलमध्ये सात नोव्हेंबरला एसी टू मध्ये ३ वेटिंग, एसी थ्री मध्ये १६ आणि स्लिपरमध्ये २६ वेटिंग सुरू आहे.
हैदराबाद, जबलपूर, बंगळूर, दिल्ली मार्गावर गर्दी कमीच
-मुंबई, पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्या दिवाळीत फुल्ल झाल्या असल्या तरी हैदराबाद, जबलपूर, बंगळूर, दिल्ली, चेन्नई मार्गावरील सर्वच रेल्वेगाड्यांत बर्थ उपलब्ध आहे. यात रेल्वेगाडी क्रमांक ०२१५९ नागपूर-जबलपूर स्पेशलमध्ये ३ ते ९ नोव्हेंबरपर्यंत सर्वच क्लासमध्ये बर्थ उपलब्ध आहेत. रेल्वेगाडी क्रमांक ०२७२४ दिल्ली-हैदराबाद तेलंगाणा स्पेशल, रेल्वेगाडी क्रमांक ०२२९६ पटना-बंगलोर स्पेशल, रेल्वेगाडी क्रमांक ०२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी स्पेशल आणि रेल्वेगाडी क्रमांक ०२६१६ नवी दिल्ली-चेन्नई स्पेशलमध्ये सर्वच क्लासमध्ये बर्थ उपलब्ध आहेत.
ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग
-स्पेशल रेल्वेगाड्या सुरू करताना रेल्वे प्रशासन प्रवाशांना कोरोनाचे नियम पाळावे लागतील, अशी अट घालते. परंतु, प्रत्यक्षात रेल्वेस्थानक आणि रेल्वेगाड्यात मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडविण्यात येत असल्याची स्थिती आहे. बहुतांश प्रवासी मास्क वापरताना दिसत नाहीत, तर रेल्वेगाड्यातही खचाखच गर्दी पाहावयास मिळत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या नियमाचे पालन करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
...............