लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य शासनाने लोककलावंतांच्या मानधानात दीडपट वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कलावंतांमध्ये आनंद पसरला होता. त्यामुळे तीन वर्षांपासून रखडलेले मानधन वाढीसह मिळेल, अशी अपेक्षा या कलावंतांमध्ये होती. मात्र या कलावंतांना मानधनवाढीचा लाभ मिळालाच नाही, उलट थकीत असलेले मानधनही कलावंतांच्या पदरात पडले नाही. त्यामुळे मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कलावंतांना अंधारातच दिवाळी घालवावी लागली.या कलावंतांनी आपले सबंध आयुष्य लोककलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्यात घालविले. संगीत तमाशा, शाहिरी पोवाडे, लावणी, प्रबोधनकार, देवीचा जागर, गोंधळ, डायका, भारुड, नकलाकार, भजन मंडळ, कीर्तनकार, गीत गायक, नृत्य करणारे व विविध वाद्य वाजविण्यात निपुण कलावंत व साहित्यिकांना शासनाच्या योजनेनुसार मानधन देण्यात येते. पूर्वी अ श्रेणी कलावंतांना २१०० रुपये मिळायचे ज्यात वाढ करून ३१५० रुपये करण्यात आले. ब श्रेणी कलावंतांना १८०० रुपये मिळायचे जे २७०० रुपये करण्यात आले, तर क श्रेणी कलावंतांना २२५० रुपये करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात या मानधनवाढीची घोषणा करण्यात आली. याशिवाय जिल्ह्यातील पूर्वी असलेला ६० कलावंतांच्या निवडीचा कोटा १०० करण्यात आला. यामुळे कलावंतांमध्ये एक आशा निर्माण झाली आहे.महत्त्वाचे म्हणजे आधीच तीन वर्षापासून कलावंतांचे मानधन रखडले आहे. मानधनवाढीने कलावंतांना आनंद झाला होता आणि तीन वर्षापासून रखडलेले मानधन दिवाळीत पदरात पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र वाढीव मानधनाचा लाभ कलावंतांना मिळाला नाही आणि थकीत असलेले मानधनही हाती आले नाही. त्यामुळे वृद्ध कलावंतांना दिवाळीसारखा सण अंधारातच घालवावा लागला. २०१७-१८ मध्ये नव्याने मंजूर झालेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसह आधीच्या कलावंतांनाही गेल्या तीन वर्षापासून वृद्धापकाळ मानधन मिळाले नसल्याने, अभावग्रस्त वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, २०१८-१९ या वर्षाला मानधनासाठी आलेले लोककलावंतांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे थकीत असलेले कलावंतांचे मानधन त्वरित निर्गमित करावे, अशी मागणी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे जिल्हा सचिव अरुण वाहणे यांनी केले आहे.आरोग्य सुविधा व प्रवासात मिळावी सवलतटीव्ही आणि मोबाईलमुळे लोककलावंतांच्या कार्यक्रमांना मागणी कमी झाली आहे. रोजगाराचे दुसरे साधन निवडणे कठीण असल्याने, हे कलावंत मिळेल त्या पैशात व आहे त्या परिस्थितीत मनोरंजन व प्रबोधनाचे काम करीत आहेत. त्यामुळे नोंदणी झालेल्या कलावंतांना प्रवास भाड्यात सवलत द्यावी, अशी मागणी विदर्भ शाहीर परिषदेने केली आहे. अनेक कलावंत गरीब परिस्थितीत जीवन जगत आहेत. काही दिवसांपूर्वी कार्यक्रमासाठी जाताना कलावंतांच्या गाडीला अपघात झाला होता. आठ कलावंत गंभीर जखमी झाले होते. महागड्या औषधोपचारामुळे कलावंतांना अडचण सहन करावी लागते. त्यामुळे या कलावंतांना विविध शासकीय योजनेतील आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा, अशी मागणी परिषदेतर्फे अरुण वाहणे यांनी केली.
अंधारातच गेली लोककलावंतांची दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 8:56 PM
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य शासनाने लोककलावंतांच्या मानधानात दीडपट वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कलावंतांमध्ये आनंद पसरला होता. मात्र या कलावंतांना मानधनवाढीचा लाभ मिळालाच नाही, उलट थकीत असलेले मानधनही कलावंतांच्या पदरात पडले नाही. त्यामुळे मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कलावंतांना अंधारातच दिवाळी घालवावी लागली.
ठळक मुद्देमानधनवाढीचा लाभ मिळाला नाही : थकीत मानधनाचीही प्रतीक्षाच