नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ‘सावित्री’ व ‘हेल्प डेस्क’सारखे लोकउपयोगी उपक्रम राबवीत असताना आपणही समाजाला देणं लागतो या उद्देशाने येथील अधिकाऱ्यांनी एकत्र येत १३ विद्यार्थिनींना दिवाळीची अनोखी भेट दिली. प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भूयार यांच्या हस्ते गुरुवारी गरजू विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या संकटामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली. काहींवर आई-वडिलांना गमावण्याची वेळ आली. आजही अनेक कुटुंब यातून बाहेर येण्यास धडपड करीत आहेत. अशा कुटुंबातील काही मुलींना मदतीचा हात देत ‘आरटीओ’ने समाजापुढे एक आदर्श ठेवला. पूर्व नागपुरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक वीरसेन ढवळे यांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले. ‘लोकमत’शी बोलताना ढवळे म्हणाले, ‘मेट्रो रेल्वे’ प्रशासनाने त्यांच्याकडील काही सायकली विकायला काढल्या होत्या. त्यांच्याशी भेटून काही सायकली विकत घेतल्या. त्यांची दुरुस्ती केली. महाल येथील दादीबाई देशमुख हिंदी मुलींची शाळा येथील गरजू मुलींची यादी तयार केली. त्यात कोरोनामध्ये आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलींसह ज्या मुलींना वसतिगृहापासून ते शाळांपर्यंत पोहोचण्यात अडचण जात होती अशा मुलींना सायकल भेट म्हणून देण्याचा विचार पुढे आला. याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भूयार यांना दिल्यावर त्यांनी तातडीने होकार दिला. त्यानुसार गुरुवारी आज १३ विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले.
-विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद
सायकल नसल्याने होस्टेलपासून ते शाळेपर्यंत पायपीट करावी लागायची. पावसात तारांबळ उडायची. शाळेला उशीर व्हायचा. मात्र, आता सायकल मिळाल्याने या सर्व समस्या निकाली निघाल्याचे एका विद्यार्थिनीने सांगितले. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांतील या विद्यार्थिनी आहेत. सायकल मिळताच सर्व विद्यार्थिनीचे चेहरे आनंदाने उजळून निघाले.