नागपूर : प्रसिद्ध पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार श्रीधर फडके व शिल्पा पुणतांबेकर यांच्या स्वरांनी सजलेला ‘दिवाळी पहाट : फिटे अंधाराचे जाळे’ हा कार्यक्रम दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अर्थात शुक्रवारी रमा एकादशी व गोवत्स द्वादशीच्या पर्वावर सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटर येथे पार पडला. प्रकाशाचा उत्सव असलेल्या भारतीय परंपरेतील सगळ्यात मोठ्या अर्थात दीपावलीचे स्वागत या कार्यक्रमाने झाले. हा कार्यक्रम जेवढा सुरेल ठरला, तेवढाच खुमासदार हाेता. जुन्या आठवणींचा पट उलगडत श्रीधर फडके यांनी गीतरचना, त्याच्यावरच चढलेला सुरेल संगीतमय साज, याचा इतिहास रसिकांपुढे उलगडला.
भोजवानी फूड्स लिमिटेड प्रस्तूत या ‘दिवाळी पहाट’चे आयोजन लाेकमत सखी मंचच्या वतीने रोकडे ज्वेलर्स व चिटणवीस सेंटरच्या सहयोगाने करण्यात आले होते. सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या ‘दिवाळी पहाट’चा भावमयी स्वरानंद घेण्यास श्रोतृवृंद उत्सुक होता. ‘चार वर्षांनंतर नागपूरला भावगीतांचा कार्यक्रम सादर करतो आहो आणि पुन्हा एकदा नागपूरकरांपुढे आलो याचा मनस्वी आनंद होत आहे’ अशी भावना व्यक्त करत श्रीधर फडके यांनी आपल्या मैफलीला प्रारंभ केला.
गदिमा उपाख्य ग. दि. माडगुळकर रचित व बाबूजी उपाख्य सुधीर फडके यांच्या स्वरांनी सजलेल्या ‘देवं देव्हाऱ्यांत नाही, देवं नाही देवालयी’ या भावगीताने प्रभातकालीन संगीत सभेतला त्यांनी सुरुवात केली. ‘गाणी कशी असावेत, याचा वस्तुपाठच या दोघांनी दिला’ अशी भावनाही श्रीधर फडके यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी संत ज्ञानेश्वर यांची रचना ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ ही रचना सादर केली. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेले हे पहिलेच अभंग होते. त्यानंतर सुधीर मोघे रचित ‘सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का’, राग भुपालीने सजलेली पं. नरेंद्र शर्मा रचित भुपाळी ‘ज्योती कलश झलके’, शांता शेळके यांची रचना ‘तोच चंद्रमा नभात’, प्रवीण दवणे यांची रचना ‘तेजोमय नादब्रह्म हे’, राग यमनमधील ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना’, सुधीर मोघे रचित ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाशं’, पूर्ण कल्याण रागमधील ‘सांज येवो कुणी, सावळी सावली’, चंद्रशेखर सावंत रचित ‘माता भवानी जगताची जननी’, ‘ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था’, सुरेश भट रचित ‘तू माझ्या आयुष्याची पहाट’, ‘रंगू बाजाराला जाते हो जाऊद्या’ असे गीत, भावगीत, अभंग सादर करत मैफल रंगविली. भूपश्री रागमधील समर्थ रामदास रचित ‘तानी स्वररंग व्हावा, मग तो रघुनाथ ध्यावा’ या अभंगाने कार्यक्रम उत्तरार्धाकडे गेला.
त्यानंतर ‘मी राधिका मी प्रेमिका’, ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’, ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’ ही गाणी सादर करत रसिकांच्या मनाचा वेध घेतला आणि ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाने कार्यक्रमाचा समारोप केला. गायनामध्ये शिल्पा पुणतांबेकर यांनी त्यांना सुरेल साथ दिली, तर तबल्यावर तुषार आकरे, तालवाद्यावर विक्रम जोशी, सिंथेसायजरवर गोविंद गडीकर आणि बांसरीवर अरविंद उपाध्ये यांनी लयबद्ध साथसंगत केली. वृषाली देशपांडे यांनी निवेदनातून या गेय मैफलीला अलंकार चढवले.
तत्पूर्वी श्रीधर फडके, शेफ विष्णू मनोहर, रोकडे ज्वेलर्सच्या शुभांगिनी खेडीकर, चिटणवीस सेंटरचे विश्वस्त विलास काळे, सीईओ संजय जोग, लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले.
‘मी नागपुरातली, वऱ्हाडा मधली’ने आणली गंमत
- भावगीतांच्या या मैफलीत श्रीधर फडके यांनी मंदार चोळकर यांची वऱ्हाडी कविता सादर केली. ‘मी नागपुरातली, वऱ्हाडामधली, मधाळ रसरसली संत्र्याची फोड, गोड गोड मी संत्र्याची फोड, गोड गोड वऱ्हाडी बोली गोड’ ही कविता सादर करत नागपूरकर रसिकांचा उत्साह द्विगुणित केला. ही कविता मी मुद्दामहून संगीतबद्ध केल्याचेही त्यांनी सांगितले. माझ्या गीतरामायण कार्यक्रमाला नागपूरकरांनी सगळ्यात जास्त प्रतिसाद दिल्याचे सांगत, सुधीर फडके यांच्यावर चित्रपट येत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
.................