नागपूर : यावर्षी ४ नाेव्हेंबर म्हणजेच गुरुवारी दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळीला महालक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची विशेषत्वाने पूजा केली जाते. विशेष म्हणजे, ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी - कुबेरपूजन हे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत.
सध्या देशभरात घराघरामध्ये दिवाळीची पूर्वतयारी जाेरात सुरू आहे. बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मागील दीड वर्षापासून काेराेना महामारीमुळे सर्व सण-उत्सवावर विरजण पडले हाेते. मात्र, या वर्षी दिवाळीसाठी लाेकांमध्ये कमालीचा उत्साह आहे. यंदा गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी - कुबेरपूजन हे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी १९ वर्षांनंतर त्रिपुष्कर याेग आला आहे. या शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास तीनपट लाभ मिळताे. याप्रमाणे, दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीमातेचे विधिपूर्वक पूजन केल्यास घरात सुख शांती व धन समृद्धी प्राप्त हाेते.
दिवाळी पूजनाचे महत्त्व
दिवाळीला लक्ष्मीपूजन केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका हाेते, असे मानले जाते. शास्त्रांमध्ये लक्ष्मीला वैभवाची देवता मानले आहे. लक्ष्मीच्या कृपेने जीवनात संपन्नता प्राप्त हाेते आणि कष्टातून मुक्ती मिळते. दिवाळीच्या रात्री शुभ मुहूर्तावर पूजन केल्यास लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त हाेते. पं. उमेश तिवारी यांनी सांगितले, ४ नाेव्हेंबर राेजी सकाळी ६.३० वाजतापासून दिवाळी अमावस्या सुरू हाेईल आणि शुक्रवारी सकाळी ६.३३ वाजता स्वाती नक्षत्रात अमावस्येचा समाराेप हाेईल. पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी ६.३० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत असेल. अभिजीत मुहूर्त दुपारी १२.१२ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत असेल. चंचल नक्षत्र सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी १.३० वाजेपर्यंत असेल आणि अमृत मुहूर्त दुपारी १.३० ते दुपारी २.५९ वाजेपर्यंत राहील.
सूर्यास्तानंतर गाेधुली प्रदाेषकाल मुहूर्त सायंकाळी ५.४० वाजल्यापासून रात्री ८.२५ वाजतापर्यंत राहील. या सर्व मुहूर्तावर लक्ष्मी माता, देवी सरस्वती, भगवान कुबेर आणि श्री गणेशाचे पूजन केल्यास सुख समृद्धी आणि संपत्तीची प्राप्ती हाेईल.