नागपूर : दिवाळीच्या तोंडावर शहरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होत असून, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. विशेषत: पंचशील चौकाजवळील पूल तुटल्यामुळे वाहतूकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सीताबर्डी बाजारात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय इतवारीतील अनेक मार्गांवर ‘वन वे’ राहणार आहे. वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. रविवार पाच नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत हे नियम पाळणे अनिवार्य राहणार आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी सितबार्डी, इतवारी, महाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. बेशिस्त वाहतूक व पार्किंगमुळे कोंडी होत आहे. त्यामुळे ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीताबर्डी बाजारात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे.
- येथे वाहनांना नो एन्ट्री
हनुमान गल्ली ते व्हेरायटी चौक, सीताबर्डी मुख्य मार्ग, मोदी क्रमांक एक, दोन व तीन
- येथे राहणार ‘वन-वे’
शहीद चौक ते मस्कासाथ चौक, तीननल चौक ते शहीद चौक, नंगा पुतळा चौक ते टांगास्टॅंड, सेंट्रल एव्हेन्यू ते गांधीबाग
- अशी वळविली आहे इतवारीतील वाहतूक
शहीद चाैकमधून किराणा ओळीमार्गे मस्कासाथ चौकाकडे जाणारे सायकल रिक्षा, दुचाकी, वाहने शहीद चौकातून डावे वळण घेऊन तीननल चौकातून भारतमाता चौकाच्या मार्गाने जातील किंवा शहीद चौकातून उजवे वळण घेऊन जुना मोटर स्टॅन्ड चौक या मार्गाने जातील.तीननल चौकामधून जुना भंडारा रोडमार्गे शहीद चौकाकडे जाणारे सायकल रिक्षा, दुचाकी, वाहने तीननल चौकातून डावे वळण घेऊन नंगा पुतळा चौक या मार्गाने जातील.
- मालवाहतूक रात्री करावी लागणार
निर्देशांनुसार इतवारीतील दुकानात मालवाहतूक करणाऱ्या थ्री व्हिलर व फोर व्हिलर वाहनांतून रात्री ११ ते सकाळी ८ या वेळेत मालाची ने-आण करावी लागेल. तसेच इतवारी शहीद चौक, मस्कासाथ, किराणा ओळी, सोना-चांदी दुकानदार तसेच इतर दुकानदार यांनी फोर व्हिलरचा वापर न करता दुचाकी वाहनांचा वापर करावा अशी सूचना करण्यात आली आहे.