लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीचा सण प्रत्येक जण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करतो. अनेक जण नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात. दिवाळीत ते घरी परततात. परंतु दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सचे दर आकाशाला भिडले आहेत. एरवी एक हजार रुपये असलेले प्रवासभाडे दिवाळीच्या काळात तीन हजारावर पोहचल्यामुळे प्रवाशांचे दिवाळे निघणार आहे.
वर्षभर प्रत्येक जण दिवाळीची वाट पाहतो. नोकरी तसेच शिक्षणासाठी अनेक जण बाहेरगावी राहतात. विदर्भातून पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आदी शहरात नोकरीसाठी तसेच शिक्षणासाठी राहणाऱ्या नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. दिवाळीचा सण प्रत्येक जण कुटुंबासह साजरा करण्यासाठी प्लॅनिंग करतो. परंतु दिवाळीत होणारी प्रवाशांची गर्दी पाहून खासगी ट्रॅव्हल्सने आपले दर तिप्पट केले आहेत. कोरोनामुळे मोजक्याच रेल्वेगाड्या सुरू आहेत. खासगी ट्रॅव्हल्सशिवाय प्रवाशांना दुसरा पर्याय नाही. त्याचा फायदा घेऊन ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी आपले भाडे वाढविले आहे. याचा प्रवाशांच्या खिशावर ताण पडणार आहे. परंतु नाईलाजास्तव त्यांना अव्वाच्यासव्वा भाडे मोजून प्रवास करण्याची पाळी येणार आहे.
असे आहेत दर
नागपूर-पुणे ८ नोव्हेंबर ९५० रुपये, १७ नोव्हेंबर ३,१००
नागपूर-औरंगाबाद ८ नोव्हेंबर ९५०, १७ नोव्हेंबर २,५५०
नागपूर-नांदेड ८ नोव्हेंबर १२००, १७ नोव्हेंबर १८३७
नागपूर-हैदराबाद ८ नोव्हेंबर १०५०, १७ नोव्हेंबर ३,०००
नागपूर-नाशिक ८ नोव्हेंबर ११४२, १७ नोव्हेंबर २,४००