प्रवीण खापरे
नागपूर : ‘डी. लिट. (डॉक्टरेट ऑफ लिटरेचर)’ ही कोणत्याही विद्यापीठाद्वारे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व कोणत्याही विषयात अकल्पित संशोधन करणाऱ्या व्यक्तीला प्रदान करण्यात येणारी सर्वोच्च पदवी आहे. मानद आणि संशोधनात्मक, अशा दोन प्रकारात प्रदान करण्यात येणारी ही सर्वोच्च पदवी राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी प्रदान करण्यावर स्थगिती दिली असताना रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात ही पदवी प्रदान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
विद्यापीठांद्वारे देण्यात येणारी पीएच.डी. ही सर्वोच्च पदवी असून या पदवीद्वारे संबंधित व्यक्तीला पदोन्नती आदींसारखे लाभ मिळत असतात. त्यानंतरही विशेष कार्यासाठी सन्मान म्हणून डी.लिट. ही पदवी मानद स्वरूपात देण्यात येत असते. या पदवीकडे केवळ सर्वोच्च सन्मान म्हणूनच बघितले जाते. त्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही आर्थिक वा व्यवस्थापनातील लाभ प्राप्त होत नाहीत. त्याच कारणाने राज्य सरकारच्या सूचनेनुसार बहुतांश विद्यापीठांनी ही पदवी बहाल करण्यास स्थगिती दिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेही या पदवीला स्थगिती दिली आहे. अशात कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने ही पदवी बहाल करताच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड गदारोळ माजला आहे. विशेष म्हणजे, प्रदान करण्यात आलेली ही पदवी संशोधनात्मक (ॲकेडेमिक) मध्ये प्रदान करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दबक्या आवाजात गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मराठीतील संशोधनाला संस्कृत विद्यापीठाने पदवी करणे योग्य की अयोग्य?
- डी.लिट. ही पदवी मानद असताना, ती संशोधनात्मक प्रबंधावर (ॲकेडेमिक रिसर्च) प्रदान करणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातही संस्कृत विद्यापीठाने संस्कृत वगळता मराठी विषयावर ही पदवी प्रदान करण्यावर आक्षेप घेतला जात आहे. या प्रकारामुळे या पदवीचे मुल्य कमी होणार असल्याचा सूर निघत आहे.
संशोधन प्रबंधात किमान १० टक्के संस्कृत असावे!
- विश्वविद्यालयाकडून आतापर्यंत ७ ॲकेडेमिक आणि ४ मानद डी.लिट. प्रदान करण्यात आल्या आहेत. हे विश्वविद्यालयाच्या धोरणातच समाविष्ट आहे. यासाठी विविध विषय तज्ज्ञांची समिती असून, त्यात त्या-त्या विषयातील विभागाच्या अधिष्ठात्यांचा समावेश आहे. कोणत्याही क्षेत्रातील एखाद्या अभ्यार्थीने आपला शोधप्रबंध (तो प्रकाशित झाला असेल वा नसेल) तो विद्यापीठाकडे डी.लिट. साठी पाठविल्यास, तो समितीकडे पाठविण्यात येतो. समितीने प्रस्ताव दिला तरच ही पदवी प्रदान करण्यात येते. एका वर्षात एक किंवा जास्तीत जास्त दोन डी.लिट. प्रदान करण्याचा निर्णय घेतला जातो. विश्वविद्यालयाच्या नियमांनुसार हा शोधप्रबंध संस्कृतसोबतच मराठी व इंग्रजीमध्ये स्वीकारला जातो. मराठी व इंग्रजीमध्ये भारतीय ज्ञान, तत्त्वज्ञान, संस्कृती या संबंधित विषयांनाच प्राधान्य देण्यात येत असून, त्यात किमान १० टक्के रचना या संस्कृतमधील असणे बंधनकारक आहे.
- डॉ. मधुसुदन पेन्ना, कुलगुरू - कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालयम्, रामटेक
..................