निशांत वानखेडे
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात आता गर्भवती महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत दोन लाखांवर महिलांना पहिला डोस देण्यात आला आहे. लसीचा गर्भावर काय परिणाम होतो, यावर वैद्यकीय संशोधकांचा अभ्यास सुरू आहे. विशेष म्हणजे, महिला आणि गर्भातील बाळांमध्ये ‘ॲण्टिबॉडीज्’ निर्माण होतात का, याच्या अचूक निष्कर्षासाठी गर्भनाळेचा अभ्यास केला जात आहे.
‘इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर) अंतर्गत राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य संशोधन संस्थेतर्फे (एनआयआरआरएच) एप्रिल २०२० मध्ये ‘प्रेग-कोविड रजिस्ट्री’ स्थापन करण्यात आली आहे. याद्वारे कोरोना महामारीचा व विषाणूचा गर्भवती महिलांवर कशाप्रकारे परिणाम होतो, याबाबत वेगवेगळ्या स्तरावर अभ्यास करून नोंद घेतली जात आहे. ‘एनआयआरआरएच प्रेगकोविड रजिस्ट्री’चे प्रमुख डॉ. राहुल गजभिये यांनी सांगितले, ‘सार्स कोविड-२’चा गर्भवती महिलांवर आणि बाळांवरही कशाप्रकारे प्रभाव पडतो याबाबत संशोधन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. संशोधन टीमद्वारे १४ स्तरावर याचा अभ्यास करूनच गर्भवती महिलांच्या लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला, हे विशेष.
-लसीचे दोन डोस घेणाऱ्या गर्भवतींमध्ये वाढल्या ॲण्टिबॉडीज
डॉ. गजभिये म्हणाले, लसीकरणामुळे महिलांवर काय परिणाम होतो, याचाही अभ्यास करणे तेवढेच आवश्यक आहे. अशा प्रकारचा अभ्यास केवळ अमेरिकेत करण्यात आला. अमेरिकेतील अभ्यासानुसार लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या गर्भवती महिलांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी चांगल्या ॲण्टिबॉडीज् तयार झाल्याचे आढळून आले आहे. इतरत्र कुठेही अभ्यास झाला नाही पण, भारताने हा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतीय संस्थेने त्याच्याही पुढे जात लसीचा महिलेवरच नाही तर गर्भावरही काय परिणाम होतो, त्यांच्यामध्ये ॲण्टिबॉडीज् तयार होतात काय, यावर अभ्यास करण्यात येत असल्याचे डॉ. गजभिये यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गर्भाला जोडणाºया प्लॅसेंटाचेही निरीक्षण केले जात असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.