लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षणात वा दैनंदिन जीवनात समाधानाची गरज आहे. गुण कमी मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनी दु:खी होऊ नये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुणांऐवजी विषयांचा सखोल अभ्यास करा, असा सल्ला महापौर नंदा जिचकार यांनी विद्यार्थ्यांना दिला.सामाजिक आणि भावनिक शिक्षणावर वनामतीच्या सभागृहात शनिवारी आयोजित राष्ट्रीय परिषदेत मुख्य अतिथी म्हणून महापौर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गिरीश गांधी होते. मंचावर डॉ. विकास महात्मे, रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी, तेजस्विनी, अश्विनी त्यागी उपस्थित होते.महापौर म्हणाल्या, देशातील शिक्षण पद्धतीच क्लिष्ट आहे. मनाप्रमाणे शिकता येत नाही. स्वत:चे व्यक्तिमत्त्व उलगडणे हे मोठे काम आहे. व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया वयाच्या ८ व्या वर्षांपर्यंत असते. त्यासाठी घरातील वातावरण आणि संस्कार महत्त्वाचे आहे. का करायचे हे ज्यांना गवसले ते मोठे झाले आहेत. वाट्याला आले ते सुंदर कसे करता येईल, यावर भर देण्याची गरज आहे. जीवनात मनासारख्या गोष्टी होत नाही, म्हणून स्वत:ला बदला. भौतिक सुखाच्या मागे धावताना आपण समाधान घालवितो आणि आनंदाच्या शोधात भटकतो. विद्यार्थ्यांनी जीवनात तणाव न घेता आत्मविश्वास वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.सुनील रायसोनी म्हणाले, विद्यार्थ्यांनी नेहमीच सकारात्मकता ठेवली पाहिजे. स्वप्न बाळगा, पण तणाव येऊ न देता ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लर्निंग मॉड्युल निरंतर सुरू ठेवा. पिढी घडवायची असेल तर सर्व गोष्टींचा उहापोह व्हायला हवा.प्रास्ताविकेत महात्मे म्हणाले, युवकांमध्ये वाढता तणाव ही एक गंभीर बाब असून, दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत आहे. नैराश्य, व्यसन, आत्महत्या ही सगळी तणावाची परिणीती आहे. या विचित्र समस्येचे योग्य समाधान होऊ शकते, याची जाणीव समाजात नसणे ही खरी समस्या आहे. हे समजून घेण्यासाठी ‘बियॉन्ड आयक्यू’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे.यावेळी शाळेत हॅपीनेस कार्यक्रम राबविणाऱ्या अपूर्वी आणि नक्ष या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.