अल्पवयीन मुले वाहतूक नियम पाळतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:21 PM2018-02-05T22:21:22+5:302018-02-05T22:23:12+5:30

शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गाला दुचाकीने जाणारी अल्पवयीन मुले वाहतूक नियम पाळतात काय, त्यांच्याकडे वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती असते काय, ते ठरवून दिलेल्या इंजिन क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाक्या चालवितात काय इत्यादी बाबींची तपासणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी गेल्या शनिवारी झालेल्या बैठकीत दिलेत. त्या बैठकीचे इतिवृत्त सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले.

Do minor children obey the traffic rules? | अल्पवयीन मुले वाहतूक नियम पाळतात का?

अल्पवयीन मुले वाहतूक नियम पाळतात का?

Next
ठळक मुद्देतपासणी होणार : पथक स्थापन करण्याचे निर्देश : हायकोर्टाच्या आदेशावरून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गाला दुचाकीने जाणारी अल्पवयीन मुले वाहतूक नियम पाळतात काय, त्यांच्याकडे वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती असते काय, ते ठरवून दिलेल्या इंजिन क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाक्या चालवितात काय इत्यादी बाबींची तपासणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी गेल्या शनिवारी झालेल्या बैठकीत दिलेत. त्या बैठकीचे इतिवृत्त सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले.
यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाने १० जानेवारी व २४ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अनुपकुमार यांनी उपरोक्त तपासणी करण्यासाठी पथके स्थापन करण्याचा आदेशही दिला आहे. शिकवणी वर्गांसाठी संबंधित क्षेत्राचे पोलीस निरीक्षक, परिवहन व मनपा वॉर्ड अधिकारी तर, शाळा व महाविद्यालयांसाठी संबंधित शाळा-महाविद्यालयांतील पर्यवेक्षक किंवा समकक्ष कर्मचारी, परिवहन व वाहतूक विभागातील अधिकारी यांचे पथक तयार करण्यास त्यांनी सांगितले. पथकांनी शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गाला अचानक भेट देऊन उपरोक्त तपासणी करावी आणि येत्या १२ फेब्रुवारी रोजी आयोजित बैठकीत त्याचा अहवाल सादर करावा अशी सूचनाही त्यांनी केली.
अल्पवयीन विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयामध्ये दुचाक्या आणण्यास मनाई करावी. विद्यार्थी दुचाकीने येत असल्यास त्यांच्याकडे दुचाकी चालविण्याची अनुज्ञप्ती असणे आवश्यक आहे. अन्यथा मुख्याध्यापक व प्राचार्यांवर कारवाई करण्यात येईल असे परिपत्रक जारी करावे असे निर्देश अनुपकुमार यांनी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी व उच्च शिक्षण सहसंचालक योगेश आहेर यांना दिलेत.
दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. वाहतूक पोलीस उपायुक्तांनी यासाठी विशेष पथक स्थापन करावे. तसेच, शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अल्प व दीर्घ मुदतीचा आराखडा तयार करण्यात यावा असेदेखील अनुपकुमार यांनी सांगितले.
वाहतूक विभागाच्या सूचना
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोरभवनातून चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, अमरावती, अकोला, मोर्शी व वरुड आणि गणेशपेठ येथून भंडारा, गोंदिया, गडचिरोली, ब्रह्मपुरी, वडसा इत्यादी भागाकडे जाणाऱ्या बसेस सोडण्यात याव्यात. छिंदवाडा व जबलपूर मार्गाने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सना पिवळी नदीजवळच्या ट्रान्सपोर्ट प्लाझामध्ये थांबा द्यावा अशी सूचना वाहतूक विभागाने केली.

Web Title: Do minor children obey the traffic rules?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.