लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक लोक स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवतात, मात्र बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास नसतो. म्हणूनच समाजातील विविध दबाव व भयापोटी ते झुकतात. नावापुरते आंबेडकरवादी होऊ नका, तर त्यांचे आदर्श व विचारांवर जगा. आज आदर्शांसाठी परत एकदा संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ संपादक रविश कुमार यांनी व्यक्त केले. नागपुरात स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ५० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाला नागालँडचे पोलीस महानिरीक्षक संदीप तामगाडगे, नवी दिल्ली येथील जीएसटीचे उपायुक्त प्रशांत रोकडे, कुसुमताई तामगाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. वृत्तवाहिन्यांवर विश्वास न ठेवता स्वत: अभ्यास केला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांनी दर्शक नव्हे तर नागरिक व्हावे, असे रविश कुमार म्हणाले. आपल्या देशात खासगी शाळांचे अवास्तव स्तोम माजले आहे. यातूनच कमकुवत नागरिक निर्माण होत आहेत. शिक्षण देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. यासाठी नागरिकांनी जागृत व्हायला हवे. राजकारणात अगोदर बंदुकांच्या आधारावर दहशत निर्माण करण्यात यायची. आता शिवराळ भाषेचे बाहुबली दिसून येतात, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.यावेळी राज्यातील गरीब कुटुंबातील ५० विद्यार्थिनींना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. अनिल बहादुरे यांनी प्रास्ताविक केले. तर सिद्धार्थ गायकवाड यांनी उपक्रमाची भूमिका मांडली.
पाच वर्षांपासून देशात अंधकारमय वातावरणमागील पाच वर्षांपासून देशात अंधकारमय वातावरण आहे. अनेक गोष्टी बोलत येत नाहीत व अभिव्यक्ती स्वातंत्र्य एका चौकटीत बंद झाल्या आहेत, असे म्हणत संदीप तामगाडगे यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र शासनावरच निशाणा साधला आहे. अनेकांना बोलण्याअगोदर विचार करावा लागत असल्याचे पाहतो आहे. मागील पाच वर्षांपासून अनेकांमध्ये एक प्रकारची घुसमट अनुभवयाला मिळते आहे. अनुसूचित जातीतील लोकांनी नोकरीमध्ये जाऊन स्वत:ला बांधून घेतले आहे. स्वत:च्या मनातील गोष्टीदेखील ते बोलू शकत नाही. या कार्यक्रमासाठी अनेक अधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. मात्र त्यांनी भीतीपोटी येथे येणे टाळले असे तामगाडगे यांनी सांगितले.