लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्न होत असतानाही प्रत्यक्षात तो वाढत आहे. हीच स्थिती मधुमेहाची आहे. यामुळे कुष्ठरोगासोबतच मधुमेहाची व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. वेळीच निदान होऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे. देशाला मधुमेह आणि कुष्ठरोगाची राजधानी होऊ देऊ नका, असे आवाहन महारोगी सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांनी येथे केले.असोसिएशन आॅफ डायबेटिज एज्युकेशन व डायबेटिज फाऊंडेशन आॅफ इंडियातर्फे रविवारी रामदासपेठेत आयोजित ‘एडेकॉन-२०१८’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर, मधुमेहतज्ज्ञाच्या राष्ट्रीय संघनटेचे अध्यक्ष डॉ. एच.बी. चंडालिया, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, संस्थेचे संचालक डॉ. सुनील गुप्ता, आहारतज्ज्ञ कविता गुप्ता उपस्थित होते.डॉ. आमटे म्हणाले, आजही समाजाच्या मुख्य प्रवाहात कुष्ठरुग्ण दिसत नाही. कुष्ठरोगावर उपचार उपलब्ध असूनही तो समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही. याउलट स्थिती मधुमेहग्रस्तांच्या बाबतीत आहे. मधुमेही रुग्णांना समाज आपलेसे करतो. यातील एक आजार शरीराला पोखरतो तर दुसरा मनाला पोखरतो. आज प्रत्येक वयोगटात मधुमेह दिसतो. ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.संचालन डॉ. सरिता उगेमुगे यांनी केले. कविता गुप्ता यांनी आभार मानले. या कार्यशाळेत देशभरातून ४५०वर डॉक्टर सहभागी झाले होते. मधुमेहीग्रस्तांच्या उपवासाला घेऊन चार चमूमध्ये झालेला वादविवाद हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य ठरले.
सातपैकी एक गर्भवती मधुमेहाने प्रभावित-डॉ. गुप्ता‘इंटरनॅशनल डायबिटिज फेडरेशन’ने (आयडीएफ) २०१५ मध्ये केलेल्या एका अभ्यासात गर्भावस्थेतील १६.२ टक्के महिलांना मधुमेहाचे लक्षणे दिसून आलीत. ज्या महिलांना गर्भावस्थेत मधुमेह होतो. त्यातील ५० टक्के महिलांचा मधुमेह हा पाच ते दहा वर्षानंतर ‘टाईप-दोन’मध्ये रूपांतरित होतो. यात ३० वर्षांच्या आतील महिलांची संख्या मोठी आहे. सातपैकी एक गर्भवती महिला मधुमेहान प्रभावित आहे, अशी माहिती डायबिटिज केअर अॅण्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली. गर्भवतींनी प्रत्येकी तीन महिन्यांच्या अंतराने मधुमेहाची तपासणी केल्यास आणि निदान झाल्यावर योग्य खबरदारी व औषधोपचार घेतल्यास मधुमेहाची रुग्ण संख्या कमी करण्यास हातभार लागू शकतो, असेही ते म्हणाले.