आॅनलाईन लोकमतनागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत त्वरित आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या १० आमदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात लाक्षणिक उपोषण केले. आरक्षण हवे, फुटबॉल नको, हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाबाबत चालढकल करू नये, असा इशारा या आमदारांनी राज्य सरकारला दिला.शिवसेनेचे सुनील प्रभू, डॉ. सुचिज मिनचेकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, भरतसेठ गोगावले, मनोहर भोईर, सदानंद चव्हाण, उल्हास पाटील, चंद्रकांत सोनवणे, तृप्ती सावंत या सदस्यांनी सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून उपोषण सुरू केले. त्यांना शिवसेनेच्या अन्य सदस्यांनी साथ दिली. एका आमदाराने मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षण द्या, अशी घोषणा दिली.लोकमतशी बोलताना आ. राजेश क्षीरसागर म्हणाले, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळालेच पाहिजे. केवळ लॉलीपॉप देऊन मराठा समाज शांत बसणार नाही.आ. मिनचेकर म्हणाले, आरक्षणाबाबत दिरंगाई होत असल्यामुळे लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न आहे. या लढ्यात काही भाजपा आमदार आमच्यासोबत आहेत. केवळ न्यायालयाचे दाखले देऊन मराठा आरक्षण लागू करण्यासाठी दिरंगाई करणे योग्य नाही. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.