दुकानदार संघाने पाळला बंद : विस्थापनामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकासमोरील टेकडी मंदिर उड्डाण पुलाखालील दुकानदारांनी आज नागपूर रेल्वेस्थानक दुकानदार संघाच्या बॅनरखाली एक दिवसीय संप पुकारून दुकाने बंद ठेवली. उड्डाण पुलाखालील दुकानदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टेकडी मंदिर उड्डाण पूल तोडून त्यांना बेरोजगार न करण्याचे आवाहन केले. यावेळी नागपूर रेल्वेस्थानक दुकानदार संघाचे सचिव रामदास धनाडे यांनी सांगितले की, टेकडी मंदिर उड्डाण पूल तोडण्यासाठी महापालिकेतर्फे राजकीय षड्यंत्र रचण्यात येत आहे. उड्डाण पूल तोडल्यास त्याचा दुकानदारांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना फटका बसून ते रस्त्यावर येतील. हा उड्डाण पूल तयार होण्यापूर्वी रेल्वेस्थानकाच्या समोर जवळपास ८० दुकाने होती. आता उड्डाण पुलाखाली १७५ दुकाने राहतील, अशा पद्धतीने हा पूल बांधण्यात आला आहे. उड्डाण पूल तयार करण्यापूर्वी रेल्वेस्थानकासमोरील दुकानदारांना हटविण्यात आले. दुकानदारांनी या विरोधात २००२ ते २००७ पर्यंत संघर्ष केला. अखेर त्यांना न्यायालयातून दिलासा मिळाला आणि २००९ मध्ये पीडित दुकानदारांना उड्डाण पुलाखाली ३० वर्षाच्या लीजवर दुकाने मिळाली. लहान दुकानांसाठी ७ लाख आणि मोठ्या दुकानांसाठी १३ लाख रुपये घेण्यात आले. या दुकानदारांमुळे रेल्वेस्थानकासमोर वाहतुकीची कोंडी आणि घाणीची समस्या निर्माण झाली नाही. परंतु महापालिका षड्यंत्र रचून उड्डाण पूल हटवित आहे. त्यामुळे दुकानदारांना विस्थापित न करण्याची मागणी त्यांनी नितीन गडकरींकडे केली आहे. संपात अजय चव्हाण, अरुण कुमार अवस्थी, बाबू भाई, शेरुभाई, शेषराव तोटे, रामोजी वानखेडे, बबलू जॉन, शकील भाई यांच्यासह दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपूल तोडू नका
By admin | Published: June 25, 2017 2:33 AM