मुख्यमंत्र्यांना निवेदन : अनिस अहमद यांनी वेधले लक्षनागपूर : अंबाझरी मार्गावरील सर्वसामान्यांना माफक दरात उपलब्ध होणारा जलतरण कक्ष विकास कामाच्या नावाखाली येत्या १ आॅक्टोबरपासून सहा महिन्यांसाठी बंद करण्यात येत आहे. हा पूल पुन्हा केव्हा सुरू होईल, याचा नेम नाही.गरीब आणि मध्यमवर्गीय जलतरणपटूंना आधार असलेला हा पूल ऐन स्पर्धांच्या दिवसांत बंद पाडू नये, अशा आशायाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच देण्यात आले. माजी मंत्री आणि पट्टीचे जलतरणपटू डॉ. अनिस अहमद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खेळाडूंना होणाऱ्या संभाव्य त्रासाबद्दल त्यांचे लक्ष वेधले. अहमद यांनी नागपूर शहरातील पूर्वीचे जलतरण तलाव मोडित निघाल्याचे निदर्शनास आणून नवे जलतरण कक्ष निर्माण करण्याची कुठलीही व्यवस्था झाली नसल्याचे सांगितले. शहराशिवाय काटोल, कळमेश्वर, उमरेड, कामठी अशा ठिकाणांहून जलतरणपटू आणि पालक अंबाझरी कक्षावर येतात. येथे स्थानिकपासून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे आयोजन होत असते. सध्या शालेय, महाविद्यालयीन आणि संघटनेद्वारा आयोजित होणाऱ्या जलतरण स्पर्धांचा हंगाम आहे. पण कक्ष बंद होणार असल्याने सरावास मुकण्याची वेळ येईल. त्यामुळे हा पूल बंद करू नये, अशी विनंती केली.रातुम नागपूर विद्यापीठाकडे स्वत:चा जलतरण कक्ष नाही. विद्यापीठाकडे जलतरण कक्ष असावा यासाठी शासनाने निधी मंजूर करण्याची तसेच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण कक्षाची उभारणी करण्यासाठी आवश्यक तो निधी लवकर मंजूर करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्र्यांनी अनिस अहमद यांच्या सूचना लक्षात घेत आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.(क्रीडा प्रतिनिधी)
नासुप्र जलतरण कक्ष बंद करू नका
By admin | Published: September 28, 2015 3:25 AM