नागपूर : महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागातर्फे गेल्या १५ दिवसांपासून माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ज्यांचे कनेक्शन कापले नाही त्यांनाही महावितरणकडून १५ दिवसांत वीज बिलाची थकबाकी भरण्याची नाेटीस बजावण्यात आली असून, पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कृषी उत्पादक संघाने या कारवाईचा विराेध केला आहे. संघटनेचे सचिव संदीप अग्रवाल यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. महावितरणने शेतकऱ्यांना लाखाेंची बिले पाठविली आहेत, जी भरणे शेतकऱ्यांना शक्य नाही. सरकारने ‘अभय याेजना’ सुरू केली; पण तीही लाभदायक ठरणार नाही. २०१५ मध्ये तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांकडून प्रति युनिट बिल वसुली करण्याचा शेतकरीविराेधी निर्णय घेतला. ज्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरणे शक्य झाले नाही व थकबाकी ४४ हजार काेटींवर गेली. त्यामुळे वर्तमान सरकारने हाॅर्स पाॅवरच्या पद्धतीने दर निर्धारित करावे आणि प्रति कनेक्शन १ रुपया घेऊन थकीत माफ करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. शेतकरी आधीच अडचणीत असताना सरकारने त्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:09 AM