नागपूर आरटीओ कार्यालयाशेजारचे शीतलादेवी मंदिर पाडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:11 AM2019-07-23T11:11:23+5:302019-07-23T11:12:15+5:30
अमरावती रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळचे शीतला माता मंदिर पुढील आदेशापर्यंत पाडण्यात येऊ नये असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरावती रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळचे शीतला माता मंदिर पुढील आदेशापर्यंत पाडण्यात येऊ नये असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला सांगितले.
मनपाने २७ जून रोजी मंदिर ट्रस्टला नोटीस बजावून मंदिर परिसर रिकामा करण्याचा आदेश दिला होता. हे मंदिर राज्य सरकारच्या जमिनीवर बांधण्यात आले असून त्याचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे मंदिर पाडले जाणार आहे. त्याविरुद्ध ट्रस्टने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मंदिराला तात्पुरते संरक्षण दिले व मनपाला नोटीस बजावून १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. हे मंदिर १९६० पूर्वीपासून अस्तित्वात आहे. त्यामुळे मंदिर पाडले जाऊ शकत नाही. यासंदर्भात गेल्या १६ एप्रिल रोजी मनपास्तरीय समितीसमक्ष सुनावणी झाली असता आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. परंतु, मनपाने त्यावर गांभीर्याने विचार केला नाही व वादग्रस्त नोटीस जारी केली असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. प्रदीप वाठोरे यांनी कामकाज पाहिले.