लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या काही दिवसांपासून शहरात झालेला कोरोनाचा ब्लास्ट ही चिंता करण्याची स्थिती असून, नागरिकांनी अत्यंत जागरुकपणे वागण्याची गरज असल्याचे कळकळीचे निवेदन व कोरोनाबाबत निष्काळजीपणे न वागण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी फेसबुकवर केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणात केले आहे.जुलै अखेर व ऑगस्ट महिन्यात नागपुरात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण एकाएकी वाढले व मृत्यूदरही वाढता असण्यामागे काय कारणे आहेत व त्याचा प्रतिरोध कसा करावा याबाबत त्यांनी आकडेवारीसह माहिती दिली.सध्या नागपुरात १७ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत व ५०० हून अधिक मृत्यू झाले आहेत.यामागे अनेक कारणे आहेत. यात नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याचे आढळून आले आहे. मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न राखणे, गर्दी करणे, दवाखान्यात उशीरा जाणे, आजारपण लपवणे, खोकताना वा शिंकताना काळजी न घेणे अशी अनेक कारणे त्यांनी सांगितली.प्रशासन वा सरकार काही करत नाही, असं नागरिक म्हणतात. मात्र नागरिक काय करत आहेत हे ते पाहत नाहीत. सणावारांचे दिवस आहेत. नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यांनी बाहेर पडताना काळजी घेतली पाहिजे. घरातून निघताना व घरी परतल्यावर सर्व काळजीचे नियम पाळले पाहिजेत.नागरिक बाहेर पडताना मास्क घालत नाहीत. समोर पोलीस दिसला की थोडा वेळ मास्क लावतात. नंतर काढून टाकतात. तसे करून ते स्वत:चा जीव तर धोक्यात घालताच पण इतरांचाही घालत असतात.नागपुरात कोरोना वाढतोय यामागे काय कारणे आहेत, हा प्रश्न स्वत:लाच विचारण्याची गरज आहे.मार्च एप्रिलमध्ये नागपुरात तंबाखू, खर्रा खाण्याचे प्रमाण झपाटयाने कमी झाले होते. मात्र जुलै ऑगस्टमध्ये हे प्रमाण पुन्हा पूर्ववत झाल्याचे आढळून आले आहे. हीदेखील एक मोठी चिंतेची गोष्ट आहे. या सोशल निवेदनात त्यांनी अनेक लहानसहान गोष्टींपासून ते मोठ्या बाबींपर्यंतच्या घटकांचा सविस्तर आढावा घेतला.जुन्या व्हिडिओला हेतूपुरस्सरपणे दाखवले जात आहेमार्चमहिन्यात शासनाच्या निर्देशानुसार फक्त डॉक्टर व रुग्णांनी मास्क घालणे अनिवार्य होते. त्यावेळी मी काढलेला व्हिडिओ आता दाखवला जातो आहे. मात्र नंतर सरकारने बदलेल्या निर्देशानुसार आम्ही मास्क घालणे अनिवार्य केला आहे. त्याबाबत सतत माहिती देत आहोत व आवाहन करत आहोत. अशा काळात जुना व्हिडिओ दाखवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांनी तसे करू नये. हा खोडसाळपणा बंद करावा.