नागरिकांनी लिहिले हायकोर्टाला पत्र : शहरात उभारले जाताहेत अनेक रहिवासी प्रकल्पनागपूर : रामदासपेठ, धंतोली, सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, सदर, जयताळा इत्यादी भागात अनेक रहिवासी प्रकल्प उभारले जात आहेत. दिवसातील काही तास सोडल्यास सतत बांधकाम सुरू असते. बांधकाम यंत्रे व तोडफोडीचा त्रासदायक आवाज परिसरात घुमत असतो. यामुळे परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे. काही नागरिकांनी याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पत्र लिहिले आहे. यावरून न्यायालयाने जनहित याचिका दाखल केली आहे.पत्रातील माहितीनुसार, पीडित नागरिक संबंधित भागात गेल्या २५ वर्षांपासून राहात आहेत. त्यांच्या कुटुंबात अगदी लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. वृद्ध व्यक्तींना विविध गंभीर आजार असून त्यांना योग्य वैद्यकीय उपचारासह आरामाचीही गरज आहे. वैद्यकीय संशोधनानुसार लहान मुले व वृद्ध नागरिकांना पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. शांत झोप न मिळाल्यास त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. रक्तदाब, हृदयरोग इत्यादी घातक आजार जडू शकतात. शांत झोप घेणे प्रत्येक नागरिकांचा महत्त्वपूर्ण अधिकार आहे. त्यात बाधा आणणे राज्यघटनेतील आर्टिकल २१ अंतर्गत देण्यात आलेल्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन ठरते. परंतु, रहिवासी प्रकल्पांतील बांधकामाच्या आवाजामुळे नागरिकांचा शांत झोप घेण्याचा अधिकार हिरावला जात आहे. बिल्डर्स व ठेकेदार बांधकामासाठी कोणतीही निश्चित वेळ पाळत नाही. रात्री १० वाजतानंतरही बांधकाम सुरू ठेवले जाते. तसेच, सकाळी ५ वाजतापासून बांधकामाला सुरुवात केली जाते. परिसरातील नागरिकांना शांत झोप घेता यावी याकरिता रात्री १० ते सकाळी ८ वाजतापर्यंत बांधकाम बंद ठेवणे आवश्यक आहे. यासंदर्भात संबंधित बिल्डर्स व ठेकेदारांना विनंतीपत्र देण्यात आले होते. परंतु, त्यांनी काहीच दखल घेतली नाही. (प्रतिनिधी)
बांधकामाच्या आवाजाने झोप येईना
By admin | Published: October 31, 2015 3:13 AM