नागपूर : नागरिकांचे पत्र दिलेल्या पत्त्यावर अचूकपणे पोहोचवून देणाऱ्या डाक विभागाने मात्र त्यांच्याच परीक्षेसाठी पाठविलेल्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचाच पत्ता देतांना घोळ केला. त्यामुळे अनेक परीक्षार्थींना डाक विभागाच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. डाक विभाग महाराष्ट्र सर्कलतर्फे ‘पोस्ट मॅन’ आणि ‘मेल गार्ड’ या पदासाठी थेट भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. रविवारी दुपारी २ ते ४ ही परीक्षेची वेळ होती. यासाठी नागपुरातूनही हजारो उमेदवारांनी अर्ज केले होते. आॅनलाईन प्रवेश अर्जाची सुविधा होती. नागपुरातील अनेक उमेदवारांना भंडारा जिल्ह्यात परीक्षा केंद्र मिळाले होते. परंतु त्यांना पाठविण्यात आलेल्या प्रवेश अर्जावरील परीक्षा केंद्राचा पत्ता भ्रमित करणारा होता. उदाहरार्थ कामठी येथील शीलरत्न डोणेकर या उमेदवाराला मिळालेले परीक्षा केंद्र रॉयल पब्लिक स्कुल असून नागपूर नाका, गुलमोहर हॉटेलसमोर राष्ट्रीय हायवे क्रमांक ६ भंडारा नागपूर असा पत्ता लिहिला होता. हा पत्ता उमेदवाराला चांगलाच भ्रमित करणारा होता. एकवेळ भंडारा लिहिले असल्याने उमेदवाराला भंडारा येथे परीक्षा केंद्र आहे, हे समजले असते. मात्र पत्त्याच्याच खाली परीक्षा केंद्राचे शहर म्हणून सुद्धा नागपूर असे स्पष्ट शब्दात लिहिण्यात आल्याने उमेदवारांचा चांगलाच घोळ झाला. अनेक उमेदवार राष्ट्रीय हायवे क्रमांक ६ वर नाक्यापर्यंत जाऊन आले. परीक्षेची वेळ २ वाजताची होती. अनेकजण दुपारी १२ वाजता घरून निघाले होते. दोन ते तीन तास पत्ता शोधत फिरले. परंतु पत्ता काही मिळाला नाही. उलट त्यांच्या प्रमाणेच परीक्षा केंद्राचा पत्ता शोधणारे अजय चंद्रवंशी, अमोल गेडाम, सुमित पराते यांच्यासह अनेक परीक्षार्थी त्यांना मिळाले. डाक विभागाच्या या घोळामुळे शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. (प्रतिनिधी)
पोस्टाच्या परीक्षेचा पत्ता मिळेना !
By admin | Published: March 30, 2015 2:22 AM