लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गृहविलगीकरणात असलेले पॉझिटिव्ह रुग्ण ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य प्रकारची लक्षणे आहेत अशा रुग्णांना फॅविपिरावीर टॅबलेट देण्यात येऊ नये, असे निर्देश मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे देण्यात आले आहे. मनपा मुख्यालयातील कोरोना वॉर रूममध्ये नुकतीच टास्क फोर्स समितीची बैठक झली. यात हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना देण्यात येत असलेल्या औषधांच्या बाबत शासनाच्या दिशानिर्देशांची व मार्गदर्शक सूचनांची पुरेपूर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी आरोग्य अधिकारी, झोनल वैद्यकीय अधिकारी, आर.आर.टी. टीम तसेच सदस्यांना दिल्या आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत महापालिका झोन स्तरावर आर.आर.टी. टीमद्वारे गृहविलगीकरणात असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना औषधोपचार पुरविल्या जाते. मात्र राज्य शासनाच्या २२ जुले २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये गृहविलगीकरणात असलेले पॉझिटिव्ह रुग्ण ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत अशांना फॅविपिरावीर टॅबलेट द्यावे, अशा सूचना प्राप्त झालेल्या नाही अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.