लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित म्हणून त्या पती, पत्नीने १४ दिवस रुग्णालयात काढले. नमुने निगेटिव्ह आल्यावर त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. परंतु पुढील १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ राहण्याचा सल्ला दिला. आता हे दिवसही आज गुरुवारी पूर्ण झाले. ते कोरोनामुक्त झाले. त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. 'हिंमत हारू नका, आशादायी बना, कोरोना बरा होऊ शकतो,' अशा शब्दांत त्यांनी बाधितांना हिंमतीचे बळ दिले.अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेली ४५ वर्षीय ही व्यक्ती सहा मार्च रोजी नागपुरात आली. ११ मार्च रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल झाली. त्याच दिवशी त्यांचे नमुने तपासण्यात आले. अहवालात कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या संपर्कात आलेली त्यांची पत्नीही पॉझिटिव्ह आली. पतीला मेयोमध्ये तर पत्नीला मेडिकलमध्ये दाखल केले. सलग १४ दिवसांच्या उपचारानंतर बरे झाले. कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त हा प्रवास दोघांसाठी अग्निपरीक्षेचा होता. परंतु आत्मविश्वास, डॉक्टरांचे प्रयत्न आणि सकारात्मक विचारांमुळे पहिले रुग्णालय आणि आता घरातील १४ दिवस पूर्ण केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कोरोनाला हरविणे सहज सोपे आहे. शासन व डॉक्टर ज्या ज्या गोष्टी करू नका असे सांगत आहेत , त्या करू नका. पाणी भरपूर प्या, पुरेशी विश्रांती घ्या. उपचार करणारे डॉक्टर, परिचारकांना सहकार्य करा. सकारात्मक विचार करा. यामुळे यातून नक्कीच बाहेर पडाल. रुग्णालयातून घरी आल्यावर घरातून बाहेर पडू नका. आम्ही घरी आल्यावर प्राणायाम, योग व इतर व्यायामाला आत्मसात केले. स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. ‘होम क्वारंटाईन’चे दिवस संपले असले तरी डॉक्टरांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तो आम्ही पाळत आहोत, असेही ते म्हणाले. त्यांनी सर्व डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी व पोलिसांचे विशेष आभारही मानले. सध्या मेयो, मेडिकलमध्ये १४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
-त्या पॉझिटिव्ह रुग्णाचेही १४ दिवस पूर्णदिल्ली प्रवाशाची पार्श्वभूमी असलेला तो रुग्ण २६ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. या रुग्णाच्या संपर्कात आलेले ११ जणही पॉझिटिव्ह आले. मेडिकलमध्ये उपचार सुरू असलेल्या या रुग्णाचे सात दिवसानंतर नमुने तपासले असता ते पॉझिटिव्ह आले होते. उद्या १० एप्रिल रोजी रुग्णालयात १४ दिवस पूर्ण होत आहेत. डॉक्टरांनुसार २४ तासांच्या अंतराने नमुने तपासले जातील. दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यावरच घरी सोडण्यात येईल.