लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजार लपवू नका, प्रशासनाला तात्काळ कळवा. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी तातडीने कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी केले.कोविड रुग्णांवरील उपचारासाठी शहरात विविध ठिकाणी सुरू केलेल्या कोविड टेस्टिंग सेंटरला मुंढे यांनी भेट दिली. इतकेच नव्हे तर आमदार निवास कोविड केअर सेंटरमधील पॉझिटिव्ह आलेल्यांची भेट घेऊन त्यांच्याशी तसेच नागरिकांशी थेट संवाद साधला. हा दौरा कोविडविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांचा आणि रुग्णांचा उत्साह वाढविणारा ठरला. मनपाद्वारे २१ ठिकाणी कोविड टेस्टिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे.मुंढे यांनी पाचपावली कोविड टेस्टिंग सेंटरला भेट दिली. या ठिकाणी टेस्टिंगसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. कोविड-१९ साठी रॅपिड टेस्ट कशी केली जाते, चाचणीचा अहवाल किती वेळात देण्यात येतो, डाटा एन्ट्री कशी केली जाते, याबाबत संपूर्ण माहिती घेतली. चाचणीसाठी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. येथे रॅपिड टेस्ट केल्यानंतर अर्ध्या तासात अहवाल प्राप्त होतो. चाचणी पॉझिटिव्ह आली तर घाबरण्याचे कारण नाही. येथून पुढे कुठे जायचे, उपचार कुठे होतील, लक्षणे नसतानाही पॉझिटिव्ह आले तर काय करावे, याबाबत मनपाच्या आरोग्य यंत्रणेची चमू पूर्णपणे मार्गदर्शन करेल, असे त्यांनी सांगितले. लक्षणे असताना पॉझिटिव्ह आलात तर रुग्णांवर रुग्णालयात उपचार होतील. लक्षणे नसतील तर गृह विलगीकरणात पाठविण्यात येईल. जर चाचणी निगेटिव्ह आली तरी नियम पाळण्यापासून आपण सुटणार नाही. नियमांचे बंधन सर्वांवरच आहे. काळजी घ्या आणि शहराला सुरक्षित ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.पिरामिड सिटी शंभूनगर कॉलनी येथे सुरू असलेल्या शिबिरालाही आयुक्तांनी भेट दिली. तेथेही त्यांनी नागरिकांशी संवाद साधला, एक खासगी डॉक्टरसुद्धा या शिबिरात चाचणी करून घेण्यासाठी आल्याचे लक्षात आले. किमान डॉक्टरांनी तरी चाचणीसाठी शिबिराची वाट न बघता लक्षणे आढळल्यास किंवा पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी, असा सल्ला दिला.इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या सेंटरला भेट दिली. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनाविरुद्ध लढा देणाºया वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विलगीकरण केंद्र, कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालय आदी ठिकाणी कार्यरत कर्मचारी, पॅरामेडिकल कर्मचारी आदींच्या धाडसाचे कौतुक केले. सेंटरची पाहणी केली. येथेही चाचणीकरिता आलेल्या नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते.रुग्णांशी साधला संवादनागपुरातील आमदार निवासात नवे कोविड केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला आणले जाते. तेथे रुग्णांच्या अन्य चाचण्या केल्या जातात. या ठिकाणी तुकाराम मुंढे यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. पॉझिटिव्ह रुग्णांशी थेट संवाद साधला. यापुढे कोविड संदर्भातील नियम नागरिकांनी पाळावे, कोरोनाला घाबरण्यापेक्षा वेळीच चाचणी करवून घ्या आणि कोरोना योद्धा बना, असे आवाहन त्यांनी केले.
आजार लपवू नका तात्काळ प्रशासनाला कळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 12:01 AM