नागपूर: रस्ता अपघात, क्रीडामधील दुखापत किंवा औद्योगिक कारणांमुळे हाताची दुखापत घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शासकीय रुग्णालयात आपतकालीन विभागात या रुग्णांचे प्रमाण जवळपास २० टक्के आहे. हाताची दुखापत वेळेत ओळखून योग्य उपचार केले गेले नाही, तर विकृत येण्याची शक्यता अधिक असते, असा अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञाचा सूर होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अस्थिव्यंगोपचार विभाग, रीजनल लिंब फिटिंग सेंटर व ऑल इंडिया ऑक्युपेशनल थेरपिस्ट असोसिएन, नागपूर शखा व इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपस्टि नागपूर जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हाताच्या दुखापतींचे व्यवस्थापन या विषयावर मेडिकलमध्ये दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे मुख्य वक्ते कॅनडाचे ओंटारियो, डॉ. श्रीकांत चिंचाळकर यांनी हाताचा दुखापतीकडे दुर्लक्ष नको, यावर भर दिला.
कार्यशाळेचे उद्घाटन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी केले. व्यासपीठावर उप-अधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, ऑथोर्पेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. सुमेध चौधरी, व्यावसायिक उपचार केंद्राच्या विभागप्रमुख डॉ. सोफिया आझाद आणि वरिष्ठ ऑथोर्पेडिक सर्जन डॉ. एन के सक्सेना उपस्थित होते. कार्यशाळेचे मुख्य वक्ते कॅनडाचे ओंटारियो, डॉ. श्रीकांत चिंचाळकर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.वैशाली काटोले, डॉ.रजनी कोवे, डॉ.स्नेहा गोयदानी, डॉ.अश्विनी डहाट यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेत विदर्भातील ५० हून अधिक ऑर्थोपेडिक सर्जन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट हे सहभागी झाले होते.