शांतिनगर पोलीस ठाण्यातील उडिया हल्ला प्रकरण नागपूर : चेन स्नॅचिंगच्या खोट्या प्रकरणात अडकविण्याच्या हेतूने जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेला प्रफुल्ल शेवुल ऊर्फ उडियावर शांतिनगर पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे भटकंतीची वेळ आली आहे. घटनेचा खरा सूत्रधार असलेल्या पोलीस शिपायाला वाचविण्याच्या प्रयत्नामुळे पोलिसांनी दुसऱ्या आरोपींना अभय दिले आहे. उडियावर १५ डिसेंबरला हल्ला करण्यात आला होता. त्याला चेन स्नॅचर दाखवून मारहाण करण्याचा बेत होता. परंतु नागरिकांनी यातील वास्तव सांगितल्यामुळे आणि आपलाच एक शिपाई यात अडकल्यामुळे पोलिसांची युक्ती अमलात येऊ शकली नाही. पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून नीलेश बोरकर नावाच्या आरोपीला अटक केली. या घटनेतील मुख्य सूत्रधार शांतिनगर पोलीस ठाण्याचा शिपाई होता. त्यानेच उडियाला फोन करून बोलविले होते. उडियाने दिलेल्या माहितीनुसार हल्ल्याच्या वेळी शिपायाने त्याचे शर्ट पकडले होते. यात त्याच्या खिशातील मोबाईल खाली पडला. शिपायाने त्वरीत मोबाईल उचलून जमिनीवर आदळला. त्यानंतर उडियाला जोरदार मारहाण केली. पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे उडिया मेयो रुग्णालयात भरती होता. याच दरम्यान पोलिसांनी त्यांच्या बयाणावर स्वाक्षरी घेऊन गुन्हा दाखल केला. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे उडियाने पोलिसांना शिपायाबाबत सांगितले. त्याने शिपायानेच फोन करून घटनास्थळी बोलविल्याची माहिती दिली. उडियाच्या मोबाईलमध्ये आॅटो रेकॉर्डिंग सिस्टीम होती. त्यामुळे त्याला येणारा प्रत्येक कॉल रेकॉर्ड होत असे. शिपायासोबत झालेली बातचीतही त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली होती. या बाबीची माहिती झाल्यानंतर शिपायाने मोबाईल मोबाईल तोडून गायब केल्याचे उडियाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्या बयाणाला काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यांनी टॉवर लोकेशनची माहिती देऊन उडियाला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या अनेक दिवसानंतर उडियाला एफआयआरची कॉपी देण्यात आली. एफआयआरची कॉपी देण्यासाठी आलेल्या शिपायाने उडियाला धमकी दिली. पोलिसांना तपासाची प्रगती विचारली असता उडियाला काहीच उत्तर देण्यात आले नाही. त्याने माहिती अधिकारात अर्ज केला. त्याला तपास सुरू असल्याचे सांगून माहिती दिल्यास प्रकरणाशी निगडित लोकांना धोका होऊ शकत असल्याचे सांगून माहिती देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर उडियाने तत्कालीन सहआयुक्त संतोष रस्तोगी यांच्याकडे तक्रार केली. रस्तोगी यांच्य निर्देशानंतर झोन ३ चे डीसीपी संभाजी कदम यांनी उडियाला कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनी ठाणेदाराला याबाबत दिशानिर्देश देण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतरही शिपायाच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली नाही.(प्रतिनिधी)
पोलिसांच्या कारस्थानातील युवकाची अधिकाऱ्यांकडून दखल नाही
By admin | Published: February 09, 2017 2:55 AM